
खेळ आणि गाण्यांतून दिला व्यसनमुक्तीचा संदेश ; ११ निकष पूर्ण करण्याचे आवाहन
मूलचेरा : तालुक्यातील तब्बल ४५ शाळांमध्ये ‘मुक्तीपथ’ अभियानांतर्गत तंबाखूमुक्त शाळा कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये जनजागृती करून शाळा परिसर पूर्णतः तंबाखूमुक्त करण्यासाठी या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या मोहिमेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा मूलचेरा, शहीद बाबुराव शेडमाके शाळा, विवेकानंदपूर, देशबंधुग्राम, श्रीनगर, भवाणीपुर, मोहूर्ली, हरिनगर, मधुरानगर, गोविंदपूर, आंबटपल्ली, सुंदरनगर, गांधीनगर, लगाम, येल्ला, कांचनपूर आणि शांतिग्राम यांसह एकूण ४५ शाळांनी सहभाग नोंदवला. यात व्यसनविरोधी गाणी आणि विविध खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तंबाखूचे दुष्परिणाम आणि तंबाखूमुक्त शाळेचे फायदे पटवून देण्यात आले. तसेच, तंबाखूविरोधी कायद्यांची तांत्रिक माहिती देऊन नियमांचे उल्लंघन केल्यास होणाऱ्या कारवाईबाबतही अवगत करण्यात आले.
मुक्तीपथचे तालुका संघटक रुपेश अंबादे यांनी तंबाखूमुक्त शाळेसाठीचे ११ महत्त्वाचे निकष समजावून सांगितले. शाळेच्या दर्शनी भागात तंबाखूमुक्तीचा फलक लावणे. शाळा परिसरात कुणीही तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करू नये. शाळेच्या भिंतीवर किंवा गेटवर ‘तंबाखूमुक्त क्षेत्र’ असे स्पष्ट लिहिणे. शाळेच्या १०० यार्ड (९१ मीटर) परिसरात तंबाखू विक्रीवर बंदी असणे. विद्यार्थ्यांनी तयार केलेली तंबाखूविरोधी पोस्टर्स शाळेत लावणे. शाळेत शिक्षक आणि विद्यार्थ्यांची विशेष समिती स्थापन करणे. परिपाठ किंवा वर्गांत तंबाखूच्या दुष्परिणामांवर चर्चा करणे. शाळा परिसरात तंबाखू, विडी, सिगारेट किंवा गुटख्याचे अवशेष सापडू नयेत. ‘कोटपा २००३’ (COTPA 2003) या कायद्याची माहिती देणारा फलक लावणे. नियमितपणे विद्यार्थी आणि शिक्षकांनी तंबाखू न वापरण्याची शपथ घेणे. नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची नोंद ठेवणे. आदी निकषांवर विद्यार्थ्यांसोबत चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थी हे उद्याचे सुजाण नागरिक आहेत. जर शाळा स्तरावरच त्यांना व्यसनांपासून दूर ठेवले, तर एक निरोगी समाज निर्माण होईल. शिक्षकांनी पुढाकार घेऊन आपली शाळा या ११ निकषांवर आधारित तंबाखूमुक्त करावी. असे आवाहन रुपेश अंबादे यांनी केले.



