गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

अहेरी नगरपंचायतीत राजकीय भूकंप! ; नगराध्यक्षांसह १० नगरसेवक अपात्र

रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीचे आदेश जारी केल्याने खळबळ

अहेरी : अहेरी नगरपंचायतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय संघर्षाला आता मोठी कलाटणी मिळाली आहे. बेकायदेशीर बांधकामांना पाठिंबा देणे आणि कर्तव्यात कसूर केल्याच्या ठपका ठेवत राज्याच्या नगरविकास मंत्रालयाने नगराध्यक्षांसह १० नगरसेवकांना अपात्र घोषित केले आहे. या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगाने तातडीने रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीचे आदेश जारी केल्याने अहेरीत खळबळ उडाली आहे.

गडचिरोलीचे तत्कालीन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी त्यांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी अहेरी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा रोजा करपेत, उपाध्यक्ष शैलेंद्र पटवर्धन यांच्यासह १० सदस्यांना अपात्र ठरवले होते. या सदस्यांवर बेकायदेशीर बांधकामांना खतपाणी घालणे. नियमबाह्य ठराव मंजूर करणे. विकासकामांमध्ये निष्काळजीपणा दाखवणे. हे आरोप ठेवण्यात आले होते.

या निर्णयाविरोधात नगरसेवकांनी मंत्रालयात अपील केले होते. ७ जानेवारी रोजी त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला होता, मात्र अंतिम सुनावणीत नगरविकास मंत्रालयाने रोजा करपेत (नगराध्यक्षा), शैलेंद्र पटवर्धन (उपाध्यक्ष), नगरसेवक विलास सिडाम, ज्योती सडमेक, सुरेखा गोडसेलवार, नौरस रियाज मोहम्मद शेख, मीना औद्रे, महेश वाळकेवार, सुनीता मंथनवार व विलास गलबले यांची अपात्रता कायम ठेवत दणका दिला.

नगरविकास मंत्रालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या उपसचिवांनी पोटनिवडणुकीची तयारी सुरू केली आहे. जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार २० फेब्रुवारी: प्रभागनिहाय कच्ची मतदार यादी प्रसिद्ध होईल. २० ते २७ फेब्रुवारी: मतदार यादीवर हरकती व सूचना नोंदवता येतील. ६ मार्च: अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.

या प्रक्रियेनंतर प्रत्यक्ष मतदानाचा कार्यक्रम घोषित केला जाणार आहे. एकाच वेळी १० पदे रिक्त झाल्याने आणि तातडीने निवडणूक लागल्याने अहेरीच्या स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button