भंडारामहाराष्ट्रविदर्भ

कालव्यात ट्रॅक्टर उलटून चालकाचा मृत्यू

भंडारा : धान पन्हे भरण्यासाठी कालव्याच्या पाळीवरून जात असलेला ट्रॅक्टर कालव्यात उलटला. यात ट्रॅक्टर चालक-मालक असलेल्या शेतकऱ्याचा ट्रॅक्टरखाली दबून दुर्दैवी मृत्यू झाला. कैलाश देवमन बावनकुळे (३५, रा. सिल्ली) असे मृताचे नाव आहे. ही घटना १९ जून रोजी दुपारी २:३० वाजताच्या सुमारास तालुक्यातील सिल्ली शेतशिवारात घडली.

कैलाश बावनकुळे यांनी काही दिवसांपूर्वीच नवीन ट्रॅक्टर खरेदी केला होता. सध्या धान पन्हें भरण्याचे काम सुरू आहे. दुपारच्या सुमारास शेतातील धान पन्हे भरुन दुसऱ्या शेतात टेकेपार उपसा सिंचन योजनेच्या कालव्याच्या पाळीने जात असताना बावनकुळे यांचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले. अनियंत्रित ट्रॅक्टर कालव्यात कोसळला. त्यात त्यांचा ट्रॅक्टरखाली दबून करुण अंत झाला. घटनेची माहिती कळताच कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

कारधाचे पोलिस उपनिरीक्षक प्रशांत साखरे, हवालदार तोमेश्वर लांबकाने, शिपाई जितेंद्र काटगाये, अभिषेक मिश्रा यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आला. आई-वडिलांना एकुलता असलेल्या कैलाशच्या अपघाती मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्यामागे आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. तपास ठाणेदार गणेश पिसाळ यांच्या मार्गदर्शनात कर्मचारी करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button