धर्मरावबाबा आत्राम यांनी सोडले गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रीपद
प्रकृतीचे कारण ; मुख्यमंत्र्यांना दिली माहिती

गडचिरोली : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडे गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र प्रकृतीचे कारण देत त्यांनी पालकमंत्री पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती दिली आहे. विधानसभा निवडणूका तोंडावर असताना आत्राम यांनी पद सोडल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला पेव फुटले आहे.
अहेरी विधानसभा क्षेत्राचे राकाँ (अजित पवार गट) आमदार तथा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडे आठ महिन्यांपूर्वी गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्र्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली होती. प्रकृती अस्वस्थामुळे एक महिन्यापूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. त्यांची प्रकृती स्थिर असली तरी, गडचिरोली जिल्ह्यात राहून गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री पद सांभाळणे शक्य होत नसल्यानेच त्यांनी ही जबाबदारी सोडण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी भ्रमणध्वनी उचलला नाही. पालकमंत्री पद सोडण्याबाबत आत्राम यांनी मुख्यमंत्र्यांना फोनवरुन माहिती दिल्याची माहिती आहे.



