माजी आ. रमेश कुथे यांचा भाजपाला रामराम!
गोंदिया : गेल्या आठवड्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे गोंदिया येथे कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी भाजपाचे माजी आ. रमेश कुथे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत जवळपास जवळपास तासभर चर्चा केली होती. तेव्हापासूनच पटोले व कुथे यांची भेट कौटुंबिक की राजकीय अशी चर्चा रंगली होती. दरम्यान या भेटीला आठ दिवसांचा कालावधी लोटत नाही तोच माजी आ. रमेश कुथे यांनी शुक्रवारी (दि.२१) भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांनी आपला राजीनामा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठविला आहे. कुथे यांच्या राजीनाम्याने विधानसभा निवडणुकीपूर्वी द्विस्ट आला आहे.
रमेश कुथे यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान शिवसेना सोडून भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यांना भाजपामध्ये प्रवेश करताना पक्ष नेतृत्वाने लोकसभा अथवा विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले होते. पण या आश्वासनाची पूर्तता गेल्या साडेचार वर्षांत भाजपाने केली नाही. त्यांना अथवा त्यांच्या पुत्रालासुद्धा जि.प. निवडणुकीत उमेदवारी देणे भाजपाने टाळले होते. तर पक्षात त्यांना दुय्यम वागणूक दिली जात असल्याची चर्चा आहे. याच सर्व गोष्टींमुळे रमेश कुथे हे मागील काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा होती.




