गडचिरोलीविदर्भ

सुरगंगा महोत्सवात १० लाखांच्या तांदळाची विक्री

महोत्सवात २२ लाखांची उलाढाल  

भंडारा : कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, आत्मा यांच्या सहकार्याने मोहाडी तालुक्यातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शेतकरी गट भोसा, यांच्या वतीने तालुका कृषी अधिकारी कार्यालय, सिव्हिल लाइन, भंडारा येथे १८ ते २५ डिसेंबर दरम्यान सुरगंगा तांदूळ व धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात भंडारा जिल्ह्यातील ३४ शेतकरी गटांनी त्यांची उत्पादने विक्रीसाठी आणली होती. सुमारे १० लाखांच्या तांदळाची विक्री महोत्सवात झाली.

महोत्सवाचे उ‌द्घाटन १८ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांच्या हस्ते झाले. आठ दिवसीय या महोत्सवात एकूण २२,३५,८२० रुपयांची विक्री झाली. भंडारा जिल्ह्याला महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार म्हणून ओळखले जाते. उत्तम दर्जाचा सुगंधित व बारीक तांदूळ जिल्ह्यात उत्पादित होतो. जिल्ह्यातील चिन्नोर वाणास भौगोलिक मानांकनही प्राप्त आहे. त्यामुळे थेट शेतकऱ्यांकडून उत्तम प्रतिचा तांदूळ खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल दिसून येत आहे. अशा प्रकारचे महोत्सव दरवर्षी कृषी विभागामार्फत एका ठराविक कालावधीत आयोजित करण्यात यावा, असे मत प्रदर्शनास भेट देण्याऱ्या ग्राहकांनी व्यक्त केले.

केंद्र सरकारच्या ‘एक जिल्हा एक उत्पादन’ संकल्पने अंतर्गत भंडारा जिल्ह्यासाठी तांदूळ हे उत्पादन निवडण्यात आले. जिल्ह्यात खरीप व उन्हाळी अश्या दोन्ही हंगामात धान पिकाची लागवड करण्यात येते. धान शेती हेच इथल्या शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे मुख्य साधन आहे. त्यामुळे उत्पादनवाढीबरोबरच धानाच्या विक्री व्यवस्थेकरिताही कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, आत्मा यांचेमार्फत प्रयत्न सुरू आहेत. याकरिता विविध योजनांच्या माध्यमातून भाताची मूल्यसाखळी विकसित करण्यात येत आहे.

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन या प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यात १३,५०० मेट्रिक टन क्षमतेचे गोडाऊन तसेच ९ राईस मिलची उभारणी प्रगतीपथावर आहे. या माध्यमातून धानाची शेतकरी ते ग्राहक थेट विक्री व्यवस्था उभारण्यास मदत होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button