
ग्रामसभेच्या हक्कावर गदा आणल्यास जिल्ह्यात विराट जनआंदोलन
गडचिरोली : जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील कर्रेम भागातील पेसा अंतर्गत सीए,एफ,आर जंगल आणि सामूहिक वन हक्क पट्ट्याची जमीन कंपार्टमेंट नंबर 1629, 1630,1631 सर्वे क्रमांक 35, 66, 67, 68 चे एकूण क्षेत्रफळ 2123,30 हेक्टर एवढी जमीन वनविभागाने ग्रामसभेला न कळवता व ग्रामसभेला कुठल्याही विश्वासात न घेता एफडीसीएम यांच्याकडे सदर भूखंड परस्पर स्थानांतरीत केले आहे. सदर वनहक्काची जमीन हस्तांतरण न करणे बाबत ग्रामसभा कर्रेम येथील ग्रामसभा तसेच या भागातील समस्त ग्रामपंचायत यांनी विशेष ग्रामसभेचे आयोजन करून एटापल्ली तालुक्यातील मौजा डुम्मे, जवेली, पंदेवाही, गुरुपल्ली, कर्रेम, कोहकल, कोंदावाही, पिट्टीगुडम या गावातील सर्व नागरिकांनी एकत्रित येऊन संबंधित विभागाला सदर जागा एफडीसीएमला हस्तांतरित न करण्याचा ठराव पारित करून दिला व सदर ग्रामसभेचा ठरावास न जुमानता वनविभागाने सदर जमीन एफडीसीएमला हस्तांतरित केली.
त्यामुळे या ठिकाणी वन विकासाच्या नावाने एफडीसीएम ने जंगल तोडण्याचा सपाटा सुरु केला आहे. तरी एटापल्ली तालुक्यातील अथवा गडचिरोली जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्याची ग्रामसभेच्या ठरावाची अंमलबजावणी जिल्ह्यात होणे गरजेचे आहे. परंतु जिल्ह्यात ग्रामसभेच्या ठरावाची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे या समस्त गावातील नागरिकांनी जिल्हाधिकारी व राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे यांची भेट घेऊन झालेल्या अन्यायाची माहिती देऊन निवेदन दिले.
यावेळी डॉ. खुणे यांनी सदर तक्रारीची दखल घेऊन सांगितले की, जिल्ह्यात कोणत्याही ग्रामसभेवर अन्याय होऊ देणार नाही. तसेच जिल्ह्यात जर ग्रामसभेच्या ठरावाला केराची टोपली दाखविली जात असेल तर लवकरच जिल्ह्यात विराट जनआंदोलन करून राज्याचे राज्यपाल यांची भेट घेणार व तमाम ग्रामसभांना न्याय मिळवून देणार असे सांगितले. जिल्ह्यातील ग्रामसभांना सक्षमीकरण करण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार संघटना पुढाकार घेईल असे प्रतिपादन केले.
यावेळी खा. नामदेव किरसान यांचे स्वीय सहायक अनुप कोहळे, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रवक्ता ग्यानेंद्र विश्वास, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष भारत खटी, विदर्भ अध्यक्ष जावेद सय्यद, जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष नानू उपाध्ये, कृष्णा वाघाडे, भामरागड तालुकाध्यक्ष भीमराव वनकर, एटापल्ली तालुकाध्यक्ष स्वप्निल मडावी, मानवाधिकार संघटना युवा समन्वयक प्रशांत शहा, सुमेन विस्वास, सुकंठ रॉय, कर्रेम ग्रामसभा पदाधिकारी मनोज वेलादि व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



