पुन्हा एकदा आदिवासी विकास महामंडळाचा गैरकारभार चव्हाट्यावर!
कोरचीच्या केंद्रावरील शेकडो क्विंटल धानाची छत्तीसगडला रवानगी?

कोरची : चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा (क) येथील धान खरेदी केंद्रातून हजारो क्विंटल धानाची अफरातफर झाल्याप्रकरणी आदिवासी विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यासह अन्य दोघांना अटक केल्याचे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एकदा महामंडळाचा गैरकारभार चव्हाट्यावर आला आहे. कोरची तालुक्यातील काही धान खरेदी केंद्रांनी खरेदी केलेल्या शेकडो क्विंटल धानाची राईस मिल मालकच चक्क छत्तीसगडमध्ये रवानगी करण्यात येत असल्याचे प्रकरण उजेडात आल्याने खळबळ माजली आहे.
आदिवासी विकास महामंडळाशी करार केल्यानंतर संबंधित राईस मिलर्सना धान खरेदी केंद्रांवरुन धानाची उचल करुन भरडाई करण्याची परवानगी देण्यात येते. त्यानंतर तयार झालेला तांदूळ गोदामात जमा करावा लागतो. पुढे अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत हा तांदूळ सरकारी स्वस्त धान्य दुकानांतून नागरिकांना वितरीत करण्यात येतो. परंतु कोरची तालुक्यात भयंकर प्रकार घडत आहे. आदिवासी विकास महामंडळ किंवा धान खरेदी संस्थांकडे पुरेशा प्रमाणात गोदामे नसल्याने लाखो क्विंटल धानाची पावसाळ्यात नासाडी होण्याची भीती असते. असे होऊ नये म्हणून आदिवासी विकास महामंडळाने राईस मिलसेना सामाईकरित्या धान ताब्यात ठेवण्यासाठी करार करुन दिले होते. त्यांना प्रत्येकी ४०० क्विंटल धान ५ हजार रुपये दराने काही अर्टी आणि शर्तीच्या अधीन राहून हे धान साठवणुकीसाठी देण्यात आले होते. परंतु कोरची तालुक्यातील गोदामातील धान छत्तीसगडला ट्रकद्वारे रवानगी करण्यात येत आहे. मसेली आणि बोटेकसा येथील वनविभागाच्या नाक्यावर तशा नोंदीदेखील घेण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रातील धान खरेदी केल्यानंतर भरडाई झालेला तांदूळ याच राज्यातील स्वस्त धान्य दुकानांना देणे अनिवार्य असताना धान छत्तीसगडला पाठविण्यात येत असल्याने मोठा गैरव्यवहार होत असल्याच्या शंकेला पुष्टी मिळत आहे. याबाबत करारानुसार गोदामातून उचल केलेल्या आणि शिल्लक धानाच्या साठ्याची सखोल चौकशी केल्यास मोठे घबाड उघडकीस येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यासंदर्भात आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक एम. एस. बावणे यांना विचारणा केली असता, खरेदी केलेले काही धान मिलिंगसाठी, तर काही सुरक्षितरित्या ठेवण्यासाठी राईस मिलधारकांना देण्यात आले आहेत. या धानाची छत्तीसगड राज्यात विक्री होत असल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करु, असे बावणे यांनी सांगितले.



