विविध प्रश्नाच्या माध्यमातून गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या विकासाकडे शासनाचे लक्ष वेधणार – आ. डॉ. देवराव होळी
२७ जून पासून महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे अधिवेशन
गडचिरोली : येत्या २७ जून पासून महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे अधिवेशन मुंबई येथे होत असून या अधिवेशनामध्ये आपण गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या कामांसाठी निधी मागण्या सोबतच विधानसभा क्षेत्रात असणान्या समस्यांच्या संदर्भात शासनाला प्रश्न करून सरकारचे लक्ष गडचिरोली विधानसभा क्षेत्राकडे वेधणार आहोत. या अधिवेशनामध्ये सामाजिक हिताच्या दृष्टीने महत्वाचे असणारे तारांकित प्रश्न ३५, लक्षवेधी प्रश्न १७, औचित्याचे मुद्दे ११ व २ अर्धा तास प्रश्नाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले आहे. सोबतच वेळेवर येणाऱ्या चर्चामध्ये आपण सहभागी होऊ जिल्हयातील समस्या मांडणार असल्याचे आ. डॉ. देवराव होळी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
दरवर्षी आपण विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पूर्वी विधानसभेमध्ये सामाजिक हिताच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे जे प्रश्न मांडतो त्या प्रश्नांची माहिती देत असतो. यावर्षी देखील आपण विधानसभा क्षेत्रातील उपसा सिंचन योजनांना निधी उपलब्ध करून देणे, वादळ वाऱ्यामुळे व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व नागरिकांना आर्थिक मदत देणे, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय सह महत्वाच्या प्रशासकीय भवनांसाठी निधी, वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासोबतच प्रवेश प्रक्रिया सुरू करणे, मार्कडा देवस्थान मंदिराचे काम सुरू करणे, नरभक्षक वाघांचा व हिंसक झालेल्या हत्तींचा बंदोबस्त करणे, वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या मृतकाच्या परिवाराला शासकीय सेवेत घेणे, वैद्यकीय महाविद्यालयासह महत्वाच्या प्रशासकीय इमारतीसाठी निधी, बंगाली बांधव, झाडे झाडीया समाज बांधव, तसेच ओबीसी बांधवांच्या सामाजिक हिताचे प्रश्न, आरोग्य सेवा, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, कर्मचान्यांसाठी पेन्शन, रेती रॉयल्टी चा प्रश्न, रस्ते पूल इत्यादी बांधकामासाठी आवश्यक असणारा निधी, शैक्षणिक कार्याकरीता निधी इत्यादी सामाजिक हिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणारे प्रश्न मांडले असून त्यातून सरकारचे लक्ष वेधणार असेही आ. डॉ. होळी म्हणाले.
पत्रकार परिषदेला लोकसभा समनव्यक प्रमोद पिपरे, माजी पंचायत समिती सभापती विलास देशमुख, युवा मोर्चा प्रमुख अनिल तिडके,तालुका अध्यक्ष विलास भांडेकर, भाजपा जिल्हा सचिव दिलीप चलाख, जयराम चलाख, साईनाथ बुरांडे यांचेसह युवा मोर्चाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




