नागपूरमहाराष्ट्रमुंबईविदर्भ

नागपूर दीक्षाभूमी येथील भूमीगत पार्कींगचे काम तात्काळ थांबवा – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो ; सरकारने आंदोलकांच्या भावनांचा आदर करावा

मुंबई : नागपूर येथील दीक्षाभूमी येथे भूमीगत पार्कींच्या कामाला जनतेचा विरोध आहे. या कामामुळे दीक्षाभूमीच्या मूळ ढाचाला तसेच स्तूपाला धोका होऊ शकतो. त्यामुळे हे काम थांबविण्याची मागणी करीत आंबेडकरी संघटना आंदोलन करीत आहेत. परंतु आंबेडकरी अनुयांचा विरोध डावलून सरकार दडपशाहीचा अवलंब करून या कामाला स्थगिती देत नाही. त्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या असून आता दिक्षा भूमीवर मोठे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे लोक भावनेचा आदर करून हे काम तात्काळ थांबवावे, अशी आमची भूमीका आहे. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून गृहमंत्र्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून आंदोलकांशी चर्चा करावी, अशी भूमीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मांडली आहे.

लोकांचा विरोध असताना, दीक्षाभूमी येथील स्तूप आणि मूळ ढाचाला धोका होण्याची भीती असताना भूमीगत पार्कींगचा अट्टाहास कशासाठी, या कामातून कोणाचा फायदा होणार आहे असे सवाल करत वडेट्टीवार यांनी सरकारच्या कारभारावर तिव्र नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने जर वेळीच या प्रकरणाची दखल घेतली असती तर आंदोलन तीव्र झाले नसते. परंतु सरकार संवेदनशील नाही जनतेच्या भावनांचा आदर करत नाही. त्यामुळे आंदोलन करण्याची वेळ येते, अशा शब्दात वडेट्टीवार यांनी सरकारला खडे बोल सुनावले आहेत.

वडेट्टीवार म्हणाले की, या सरकारच्या काळात जेवढी आंदोलने झाली ती सर्व आंदोलने संवेदनशीलपणे हाताळली नाहीत. त्यामुळे आंदोलने चिघळली गेली. शेतकरी, विद्यार्थी, महिला, कर्मचारी तसेच आरक्षणावरून सुरू असलेली आंदोलने भाजपच्या काळात दडपण्याचाच प्रयत्न केला गेला. त्यामुळे आज देखील दिक्षाभूमी येथे तशीच परीस्थिती निर्माण झाली आहे. सरकारने वेळीच हस्तक्षेप करून आंदोलकांची चर्चा करून यावर तोडगा काढावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button