गडचिरोलीविदर्भ

युआयटीच्या पहिल्या बॅचच्या कामगिरीवर संस्थेची ओळख ठरणार, ‘दीक्षा आरंभ’ कार्यक्रमात जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे विद्यार्थ्यांना आवाहन; तांत्रिक ज्ञानासोबत कौशल्य आणि आत्मविश्वास विकसित करण्याचा सल्ला

गडचिरोली, दि. १ सप्टेंबर : गडचिरोलीच्या तंत्रशिक्षण क्षेत्रात नव्या पर्वाची सुरुवात करणाऱ्या **युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (युआयटी)**च्या पहिल्या बॅचवर संस्थेची भविष्यातील ओळख घडविण्याची मोठी जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांचे यश, शैक्षणिक प्रगती आणि विविध क्षेत्रांतील कामगिरी हीच पुढील काळात युआयटीची ओळख ठरणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळविण्यापुरते मर्यादित न राहता तांत्रिक ज्ञानासोबत व्यावहारिक कौशल्य आणि आत्मविश्वास विकसित करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले.
गोंडवाना विद्यापीठ संचलित युआयटीमध्ये शैक्षणिक सत्र २०२६-२७ मधील बी.टेक. विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘दीक्षा आरंभ’ (इंडक्शन प्रोग्राम) कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, युआयटीचे प्रभारी मनीष उत्तरवार, लॉयड्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष संजय गुप्ता यांच्यासह अधिकारी, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
बारावीनंतर व्यावसायिक शिक्षणाच्या प्रवासाला सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी युआयटी महत्त्वाचे व्यासपीठ ठरत आहे. संस्थेतील चार वर्षांच्या अभ्यासक्रमात तांत्रिक शिक्षणासोबत दोन महिन्यांची इंटर्नशिप करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या माध्यमातून उद्योगांतील प्रत्यक्ष कामकाज, तांत्रिक प्रक्रिया आणि व्यावसायिक कार्यसंस्कृती समजून घेता येणार आहे.
लॉयड्ससह विविध कंपन्या व उद्योग क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे उद्योगांच्या गरजा ओळखून त्यानुसार कौशल्य विकसित करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button