
तातडीने रस्त्याचे काम सुरू करा, अन्यथा तीव्र आंदोलन – विनोद झोडगे
ब्रम्हपुरी : गांगलवाडी ते मुडझा मार्गावर बुधवार, २५ जून रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास रेती वाहतूक करणारा एक ट्रक बरडकिन्ही गावाजवळ रस्त्यातील खड्ड्यात फसल्याने तब्बल दहा तास वाहतूक कोंडी झाली. यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. वाहतूक ठप्प झाल्याने या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली होती.
हळदा-आवळगाव मार्गाने गांगलवाडीच्या दिशेने रेती वाहतूक करत असलेला एमएच २९ बीडी ७९८२ क्रमांकाचा ट्रक बरडकिन्ही गावाजवळ रस्त्याच्या मधोमध असलेल्या मोठ्या खड्ड्यात अडकला. गांगलवाडी-मुडझा मार्गावर जड वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने रस्त्याला जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. निवडणुकीपूर्वीच आमदार विजय वडेट्टीवार यांनी या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन केले होते. वर्षभरापासून या रस्त्याचे काम सुरू असले तरी, कामाला गती मिळत नसल्याने रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. काल रात्रभर झालेल्या पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचले होते, ज्यामुळे वाहनचालकाला खड्ड्याचा अंदाज आला नाही आणि ट्रक थेट रस्त्याच्या मधोमध फसला. सकाळी सहा वाजल्यापासून सुरू झालेली वाहतूक कोंडी जवळपास दहा तासांपर्यंत सुरू राहिली.
घटनेची माहिती मिळताच कम्युनिस्ट पार्टीचे विनोद झोडगे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ संबंधित ठेकेदाराला बोलावून वाहतूक सुरळीत करण्याची सूचना केली. तसेच, बांधकाम अभियंत्यांशी संपर्क साधून रस्त्याचे बांधकाम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी केली, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यानंतर जेसीबीच्या मदतीने अडकलेला ट्रक बाहेर काढण्यात आला आणि वाहतूक सुरळीत झाली. विनोद झोडगे यांच्या हस्तक्षेपानंतर ठेकेदाराने तात्काळ खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्याचे मान्य केले.
विनोद झोडगे यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, “परिसरात खरीप हंगामाची कामे जोमात सुरू आहेत. शेतकऱ्यांना बी-बियाणे घेण्यासाठी गांगलवाडी, ब्रह्मपुरी येथे जावे लागते. तसेच भाजीपाला विक्रेत्यांना आणि शैक्षणिक सत्र सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना व नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी दैनंदिन जावे लागते. गेल्या चार वर्षांपासून या मार्गाची दयनीय अवस्था झाली असून ‘खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.” जड वाहतुकीमुळे रस्त्याची पुन्हा दुरवस्था होत असून, तात्काळ दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विनोद झोडगे यांनी दिला आहे.



