
सिरोंचा : तालुक्यातील नारायणपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या मुख्य कार्यकर्त्यांनी पक्षांतर्गत प्रणाली आणि गटबाजीवर तीव्र नाराजी व्यक्त करत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
नारायणपूर येथे सत्यम अंबाला, भास्कर मुलगुरी, नागेश कोय्यला, दिनेश कोय्यला हे मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) साठी प्रामाणिकपणे काम करत होते. मात्र, गावात सुरू असलेल्या अतंर्गत गटबाजीला कंटाळून आणि पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत या प्रमुख कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व जि.प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव हणमंतू मडावी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष सतीश जवाजी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आकूला मल्लिकार्जुनराव, काँग्रेस नेते व माजी सरपंच रवी सल्लम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नागराजू इंगीली आदींनी सर्व कार्यकर्त्यांचे पक्षाचे दुपट्टे घालून आणि पुष्पगुच्छ देऊन पक्षात स्वागत केले.
सिरोंचा तालुक्यात ग्रामीण आणि शहरी भागात काँग्रेस पक्ष हळूहळू आपली पकड मजबूत करत असल्याचे या पक्षप्रवेशावरून दिसून येत आहे. यावेळी काँग्रेस पक्षाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



