कारमधून गांजाची तस्करी ; २०.४७ लाखांचा १०२ किलो गांजा जप्त
एका आरोपीला अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
वर्धा : उडीसा राज्यातून मोठ्या प्रमाणात गांजाची खेप घेऊन वर्धा जिल्ह्यात दाखल होत असलेल्या कारला पकडण्यासाठी कारच्या मागे अन् पुढे ट्रॅक्टरद्वारे ‘फिल्डिंग’ लावून गांजाची खेप भरलेली कार ‘सिनेस्टाईल’ जाळ्यात अडकवून आरोपीस अटक केली. पोलिसांनी कारसह १०२ किलो ३६० ग्रॅम वजनाचा गांजा असा एकूण २५ लाख ५७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सिर्सी ते गिरड रस्त्यावर करण्यात आली. याप्रकरणी आणखी दोघांविरुद्ध गिरड ठाण्यात १ रोजी गुन्हा दाखल केला. एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा जप्तीची ही जिल्ह्यात पहिलीच कारवाई ठरली.

सूरज राजकुमार वासेकर (वय २८, रा. हिंगणघाट) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे, तर आशिष हाडके (रा. कडाजना), अस्मित भगत (रा. सेवाग्राम) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहे. त्यांच्या अटकेसाठी पोलिस पथक रवाना झाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक १ जुलै रोजी गिरड परिसरात गस्त घालत असताना त्यांना एमएच ३१ ईए. १९७९ क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या कारमधून गांजाची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सिर्सी ते गिरड अशा नागपूरकडून गिरडकडे येणाऱ्या मुख्य मार्गावर ‘झिकॉक’ पद्धतीने बॅरिकेडिंगद्वारे नाकेबंदी केली असता कार भरधाव येताना दिसली.
कारला थांबविण्याचा इशारा दिला असता चालकाने वाहन सुसाट पळविले. मात्र, मोठ्या शिताफीने त्यास पकडून अटक केली. कारची पाहणी केली असता डिक्कीत वेगवेगळ्या लहान आकाराच्या पन्नीत प्लास्टिक टेपने गुंडाळून तयार केलेल्या एकूण ५० पाकिटात १०२ किलो ३६० ग्रॅम गांजा आढळला. हा गांजा आशिष हाडके व अस्मित भगत या दोघांचा असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तिघांविरुद्ध गिरड ठाण्यात गुन्हा दाखल केला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या निर्देशात सहायक पोलिस निरीक्षक संतोष दरेकर, संदीप गाडे, पोलिस उपनिरीक्षक उमाकांत राठोड, अमोल लगड, हमीद शेख, चंद्रकांत बुरंगे, सचिन इंगोले, राजेश तिवस्कर, मनोज धात्रक, अरविंद येणुरकर, संजय बोगा, यशवंत गोल्हर, प्रमोद पिसे, रितेश शर्मा, पवन पन्नासे, महादेव सानप, रामकिसन इप्पर, मनीष कांबळे, प्रदीप वाघ, राकेश आष्टनकर, विकास अवचट, अरविंद इंगोले, अभिषेक नाईक, विनोद कापसे, अखिल इंगळे यांनी केली. या कारवाईमुळे गांजाविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. त्यांच्यापर्यंत पोलिसांचे हात पोहोचण्याची शक्यता आहे




