
तुमसर/खापा : तुमसरहून मोहाडीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एसटी बसने दुचाकीस्वाराला चिरडले. यात दुचाकीवरील तरुण जागीच ठार झाला. जीवन गुलाब गोमासे (३०) रा. खरबी असे मृत ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवार, ५ जुलै रोजी तुमसर-भंडारा राष्ट्रीय महामार्गावरील खरबी येथे सायंकाळी ६ वाजतादरम्यान घडली.
मोहाडीकडे प्रवासी घेऊन जाणारी एसटी क्रमांक एमएच १३ सीयू ९३६० ने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकी क्रमांक एमएच ३६ एडी ५३९० ला धडक दिली. जीवन हा घरच्या शेळ्या शोधायला मोहाडीकडे जात होता. पावसाला सुरुवात झाली असल्याने तो मोहाडीमार्गे दुचाकीने घरी परत येत असताना हा अपघात घडला. अपघाताची माहिती होताच घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती.
घटनेची माहिती मोहाडी पोलिसांना देण्यात आली. मोहाडी पोलिस घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मोहाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. जीवन हा विवाहित होता. त्याच्या मागे पत्नी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. तपास मोहाडी ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप पुल्लरवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दुधकावरा, बिट अंमलदार भोंगाडे, कुभलकर आदी करीत आहेत.



