गडचिरोलीविदर्भ

कोंबड्याला वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी झुंज ; कुरखेडा येथील शेतकऱ्याचे धाडस

गडचिरोली : राज्यात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे भीतीचे वातावरण असताना, गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात एक थरारक घटना समोर आली आहे. आंबेटोला येथील एका व्यक्तीने आपल्या कोंबड्याला बिबट्याच्या तावडीतून सोडवण्यासाठी थेट त्याच्याशी झुंज दिली. या झटापटीत तो गंभीर जखमी झाला, मात्र त्याने दाखवलेले धाडस चर्चेचा विषय ठरले आहे. कलीराम धोंडू हलामी (वय ५५, रा. आंबेटोला) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे.

कलीराम हलामी हे रात्री घरी झोपले असताना, कोंबड्यांच्या कोकावण्याचा आवाज ऐकून ते बाहेर आले. यावेळी बिबट्या तोंडात कोंबडा धरून पळत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कोंबडा सोडवण्यासाठी त्यांनी कोणताही विचार न करता बिबट्याचा सामना केला. त्यांच्यात काही काळ जोरदार झटापट झाली. काही वेळानंतर बिबट्या कोंबडा घेऊन पळून गेला; मात्र कलीराम हलामी यांच्या शरीराच्या अनेक भागांवर बिबट्याच्या पंजाचे गंभीर ओरखडे बसले. त्यांना तातडीने कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जांभूळखेडा परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे ठसे आढळत होते. याच पार्श्वभूमीवर वनविभागाने रात्रीच आंबेटोला गावात जाऊन बिबट्याचा सामना झाल्यास बचाव कसा करावा, याबाबत प्रात्यक्षिके व व्हिडीओद्वारे जनजागृती मोहीम राबवली होती.

जनजागृतीनंतर अवघ्या दोन तासांतच ही झटापट झाल्याने, बचावावेळी हलामी यांनी धैर्य दाखवण्यासाठी या जागृती मोहिमेचा फायदा झाला असावा, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये रंगली आहे. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मीकांत गोपूलवाड, क्षेत्र सहायक संजय कंकलवार यांच्यासह वनरक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमीला शासकीय वाहनाने रुग्णालयात हलविले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button