जमीन फसवणूक प्रकरणी बहीण-भावाला अटक

गडचिरोली : येथील सोनापूर शिवारातील सव्हें क्र. 18/1 मधील शेतजमीन आपल्या सहभागीदारांना अंधारात ठेवून त्या जमिनीला अकृषक करून परस्पर विक्री केल्याप्रकरणी वहीण-भावाला सोमवारी (दि. 8) गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. जयश्री चंद्रिकापुरे (निकोसे) व विशाल निकोसे अशी आरोपी भावंडांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, जयश्री चंद्रिकापुरे व विशाल निकोसे या भावंडांसह येथील कंत्राटदार नागनाथ (राजू) भुसारे आणि मनोज सुचक यांनी सामूहिकरित्या सोनापूर शिवारातील सर्वे क्र. 18/1 मधील 0.51.59 हेक्टर आर शेतजमीन जमीनमालक सुरेश नैताम यांच्याकडून खरेदी केली. आपल्याकडे पैसे नाहीत, असे सांगून जमीन खरेदीसाठी निकोसे भावंडांनी भुसारे यांच्याकडून 24 लाख व सुचक यांच्याकडून 24 लाख 13 हजार असे, एकूण 48 लाख 13 हजार रुपये घेऊन जमीन मालकाला दिले व जमीन चारही सहभागीदारांच्या नावाने रजिस्ट्री करुन घेतली. जमीनीची खरेदी झाल्यानंतर नागनाथ भुसारे व मनोज सुचक यांना कुठल्याही प्रकारची भनक लागू न देता जयश्री चंद्रिकापुरे व विशाल निकोसे या दोन भावंडांनी सहभागीदार भुसारे आणि सुचक यांच्या खोट्या सह्या करून त्यांच्या संमतीचे संमतीपत्र नगर परिषदेच्या मुख्याधिका-यांकडे 8 डिसेंबर 2022 रोजी सादर करून सदरची जमिन अकृषक करून घेतली.
सहभागीदार भुसारे व सुचक यांना आपली फसवणूक करून परस्पर निकोसे भावंडांनी जमीन विकल्याचे माहीत झाल्यानंतर त्यांनी गडचिरोली पोलिसांकडे तक्रार दाखल केली. याशिवाय त्यांच्याविरोधात न्यायालयातही धाव घेतली. याप्रकरणी सोमवारी गडचिरोली पोलिसांनी निकोसे भावंडांना फसवणुकीच्या आरोपाखाली अटक केली आहे. मंगळवारी (दि. 9) त्यांना न्यायालयापुढे हजर केले जाणार असल्याची माहिती दिली आहे.



