महाराष्ट्रमुंबई

मांडवी वनपरिक्षेत्र कार्यालय वनजमीन लुटणाऱ्या माफियांचा अड्डा – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची चौकशीची मागणी

वनजमीन अतिक्रमण बाधित ; लाखो रुपयांचे हफ्ते घेऊन माफियांना संरक्षण

मुंबई : तुंगारेश्वर अभारण्याच्या इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये असलेल्या राखीव व संरक्षित वनाच्या वनजमिनी मांडवी वनपरिक्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळे अतिक्रमित झालेल्या आहेत. प्रादेशिक वन विभागाचे मांडवी वनपरिक्षेत्र कार्यालय वनजमीन लुटणाऱ्या माफियांचा अड्डा बनला आहे. या वनजमिनी वाचविण्यासाठी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

वडेट्टीवार म्हणाले की, येथील वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल आणि वनरक्षक यांच्याकडून आर्थिक देवाणघेवाण करुन संरक्षित वनाची, राखीव वनाची वनजमीन लुटणाऱ्या माफियांना दर महिन्याला लाखो रुपयांचे हफ्ते घेऊन त्यांना संरक्षण दिले जात आहे. तुंगारेश्वर अभयारण्याच्या इको सेन्सिट‍िव्ह झोनमध्ये मोठ्या प्रमाणात वन्यजीवांचे जीवन बाधित करणारे कारखाने आणि अवैध बांधकामे होत आहेत. रोज शेकडो स्क्वेअर फुटांची वनजमीन मांडवी वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात अतिक्रमण बाधित होत आहे.

वडेट्टीवार म्हणाले की, चंद्रपाडा येथे वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या कार्यकाळात संगनमताच्या धोरणामुळे आणि चुकीच्या कार्यपद्धतीमुळे वनजमिनीवरील अतिक्रमणामध्ये उघडपणे व्यवसाय सुरु आहे. मौजे कण्हेर येथील संरक्षित वनाच्या जमिनीमध्ये आलिशान बंगल्यांची निर्मिती झालेली आहे, त्या अवैध बांधकामास वन विभागाचे अधिकारी संरक्षण देत आहेत. सध्या इको सेन्सिटीव्ह झोनमध्ये बेकायदा बांधकामाची आणि प्रदूषणकारी कारखान्यांची नेमकी काय स्थिती आहे, याचा तपशिल मंत्री महोदयांनी संकलित केला तर अत्यंत भयावह सत्य उघडकीस येईल, अशी विदारक परिस्थिती आहे.

या अवैध बांधकामांमुळे थेट तुंगारेश्वर अभयारण्याचे वन्य जीवांचे क्षेत्र बाध‍ित होत असल्यामुळे, याबाबत सखोल चौकशी करुन मांडवी वनपरिक्षेत्रात सुरु असलेले अवैध बांधकामे तात्काळ निष्काषित करुन या अवैध बांधकामास संरक्षण देणाऱ्या दोषी अधिकारी/कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button