15 जुलैपासुन राज्य महसूल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप

गडचिरोली : महाराष्ट्र राज्यातील महसुल विभागातील कर्मचाऱ्यांचे विविध वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 10 जूलै, पासुन टप्या टप्यानी आंदोलन करुन बेमुदत संप आयोजित करण्यात आला असुन, संपामध्ये 10 जुलै रोजी काळ्या फिती लावून काम करण्यात आले. तर 11 जुलै रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करुन, निषेध व्यक्त करण्यात आले, तर १२ जुलै रोजी संपाच्या तिसऱ्या दिवशी, संपूर्ण राज्यामध्ये महसुल कर्मचाऱ्यांनी लेखनीबंद आंदोलन 100% यशस्वी केले आहे. यामध्येजोपर्यंत शासनांकडून मागण्या पुर्ण करण्याचे आश्वासन दिले जाणार नाहीत, तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही, अशी माहिती महाराष्ट्र राज्य विभागीय महसुल कर्मचारी संघटना, नागपूरचे विभागीय कार्यध्यक्ष तथा नायब तहसिलदार अमोल गव्हारे, महसुल कर्मचारी संघटना, गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष चंदु प्रधान तसेच जिल्हाकार्याध्यक्ष तथा नायब तहसिलदार वनिशाम येरमे यांनी दिली.
या संपाच्या वतीने महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या शासनांकडे सादर करण्यात आल्या आहेत. यामध्ये सन 2006 पासूनचा सुधारीत आकृतिबंधाची प्रमुख मागणी आहे. सध्या पुर्वीच्या जुन्या आकृतिबंधानुसार तब्बल 30 ते 35 टक्के पदे रिक्त आहेत, म्हणून एका अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांकडे एका पेक्षा अधिक पदाचा कार्यभार सोपविण्यात आल्यामुळे महसूल विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याबाबत राज्य शासनाकडून दांगट समितीचा अहवाल राज्य शासनांकडून स्विकारला आहे, परंतु त्या अहवालाची अंमलबजावणी अद्याप करण्यात आली नसल्याने नाइलाजास्तव सदर संप पुकारावे लागले असल्याचे पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली.
या आहेत संपाच्या प्रमुख मागण्या :-
- दांगट समितीच्या अहवालाची शिफारशी लागु करुन तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी.
- महसूल विभागाचा सुधारीत आकृतिबंध तात्काळ मंजूर करण्यात यावा.
- राजपत्रित नायब तहसीलदार या पदाचा ग्रेडपे राजपत्रित अधिकाऱ्याप्रमाणे रु. 4800/- देण्यात यावा.
- कर्मचाऱ्यांचे पगार नियमित होण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा.
- अव्वल कारकून या पदावरील कर्मचाऱ्यांचे सुधारित वेतन निश्चित करण्यात यावेत.
- अव्वल कारकुन या पदाचे नामांतरण सहायक महसूल अधिकारी करावे.
- महसूल सहायक या पदाचे ग्रेड-पे रु. 2400 करावा.
- शासन निर्णयानुसार अव्वल कारकुन पदावरुन मंडळ अधिकारी पदावर अदलाबदली करण्यात यावी.
- नियमीत सेवा व पदोन्नतीसाठी एकच परिक्षा पध्दत वापरावी.
- शिपाई कर्मचा-यांना तलाठी संवर्गात 25 टक्के पदोन्नती दयावी.
अशा प्रमुख मागण्यांसाठी महसूल विभागांकडून संपुर्ण राज्यांमध्ये राज्यव्यापी बेमुदत संपाचे आयोजन 15 जुलै, 2024 पासून करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय अध्यक्ष तथा नायब तहसिलदार राजु धांडे, विभागीय सचिव स्नेहल खवले, विभागीय कार्याध्यक्ष तथा नायब तहसिलदार अमोल गव्हारे व महसुल कर्मचारी संघटना, गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष चंदु प्रधान तसेच जिल्हाकार्याध्यक्ष तथा नायब तहसिलदार वनिशाम येरमे यांचे मार्फत निवेदनामधुन नागपूर विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकारी तसेच सर्व तहसिदलदार यांना देण्यात आलेली आहे.
संपाच्या यशस्वीतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोलीमधील सर्व वर्ग-2 अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.



