
वर्धा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. येथील जिल्हा न्यायाधीश – ४ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. व्ही. आदोने यांनी हा निर्णय सुनावला. प्रमोद प्रल्हादराव मोकासे (३४) असे आरोपीचे नाव आहे.
२५ जुलै २०२१ रोजी रात्री १०:३० च्या सुमारास आरोपीने पीडितेला कॉल केला व तिला आय लव्ह यू म्हटले. ‘जर तू मला नाही भेटलीस, तर तुझ्या परिवाराचे नुकसान करेन, मी तुला सोडणार नाही,’ अशी धमकी दिली. त्यावर पीडितेने कोण बोलत आहे म्हणून विचारले असता, आरोपीने नाव सांगितले. याबाबत तिने वडिलांना माहिती दिली. मात्र वडिलांनी दुर्लक्ष करत पुन्हा फोन आला तर उचलू नको, असे सांगितले.
यानंतर २८ जुलै २०२१ रोजी सकाळी ११:३० च्या सुमारास पीडिता मैत्रिणीसोबत शाळेतून घरी परतत असताना आरोपीने त्यांचा पाठलाग केला. गावातील एका बँकेजवळ तो आडवा झाला. त्याने तिचा हात पकडून पुन्हा आय लव्ह यू म्हटले. तिने आरोपीला झटका देऊन हात सोडवला. नंतर पीडिता घरी निघून गेली. तिने घटनेची माहिती वडिलांना दिली. त्यानंतर वडिलांसोबत पुलगाव पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक सोनाली राठोड यांनी केला.
सबळ पुरावा उपलब्ध झाल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारतर्फे सहायक सरकारी अभियोक्ता विनय आर. घुडे यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. स्वाती एन. गेडे (दोडके) यांनी मदत केली. पैरवी अधिकारी सहायक फौजदार अनंत रिंगणे यांनी सहकार्य केले. एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, पीडितेच्या दोन मैत्रिणी, वडील व इतर साक्षीदारांची साक्ष तसेच सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश आर. व्ही आदोने यांनी शुक्रवारी आरोपीला शिक्षा ठोठावली.
आरोपीविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ८ नुसार गुन्हा दाखल केला होता. त्यात आरोपीला तीन वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा व एक हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास एक महिना सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ नुसार तीन वर्षांचा सश्रम कारावास, एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. भादंवि कलम ५०६ नुसार पुन्हा तीन वर्षांचा सश्रम कारावास, एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिन्याच्या सश्रम कारावसाची शिक्षा ठोठावली. शिवाय कलम ३५७ नुसार पीडितेला नुकसानभरपाई म्हणून दंडाच्या रकमेतून दोन हजार रुपये देण्याचे आदेश दिले.



