काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी ; डॉ. सोनल कोवे यांच्या सक्रियतेने उंचावल्या भुवया

गडचिरोली : लोकसभेची निवडणूक पार पडताच आता राज्यात होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला वेग आल्याचे पहावयास मिळत आहे. गडचिरोली विधानसभा मतदार संघात यावेळी महायुती आणि महविकास आघाडीत इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी बघावयास मिळत आहे. लोकसभेत काँग्रेस उमेदवारांनी बाजी मारल्याने जिल्हयातील विधानसभा मतदार संघात यावेळी काँग्रेसकडून उमेदवारी मिळविण्यासाठी अनेकांनी प्रयत्न चालविले आहेत.
गडचिरोली विधानसभा मतदार संघातून काँग्रेसकडून महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विश्वजित कोवासे, काँग्रेसच्या महीला नेत्या कुसुम आलाम, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर पोरेटी हे इच्छूक असून आता त्यात शहरातील दंतचिकित्सक डॉ. सोनल कोवे यांचीही भर पडली आहे. सध्या त्या काँग्रेस पक्षाच्या तसेच इतर विविध कार्यक्रमाला नित्याने हजेरी लावत असून मतदार संघात गाठीभेटी वाढविल्याने त्यांची विधानसभा निवडणुक लढविण्याची इच्छा आता लपून राहिली नाही. त्यामुळे काँग्रेसमध्ये अनेकांच्या भुवया उंचावल्या असुन काँगेसमधील एका गटाकडून त्यांना अनुकूल नव्या चेहऱ्यांची उमेदवारीसाठी जी चाचपणी केली जात आहे, त्यात डॉ. सोनल कोवे यांचा समावेश असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
दंत चिकित्सक डॉ सोनल कोवे या गडचिरोली शहरातील दंतचिकत्सक डॉ. चेतन कोवे यांच्या पत्नी आहेत. गडचिरोली विधानसभा मतदार संघात काँग्रेस कडून उमेदवारीची लॉटरी नेमकी कुणाला लागते याकडे मतदार संघातील काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष असून उमेदवारीसाठी इच्छुक उमेदवारांनी आतापासून मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे.



