गडचिरोलीविदर्भ

आ. डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते पोर्ला येथे सुसज्ज वाचनालयाचे भूमिपूजन

ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा नवा मार्ग मोकळा ; ‘गावांचा विकास ज्ञान आणि संस्कृतीने होतो‘ – डॉ. नरोटे

गडचिरोली: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहराप्रमाणेच दर्जेदार शैक्षणिक सुविधा मिळाव्यात या उद्देशाने, आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या विशेष प्रयत्नातून पोर्ला येथे सुसज्ज वाचनालयाचे बांधकाम केले जाणार आहे. जिल्हा वार्षिक निधी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या या वाचनालयाचे भूमिपूजन नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले. आ. डॉ. नरोटे यांनी विधिवत पूजन करून आणि कुदळ मारून या प्रकल्पाची औपचारिक सुरुवात केली.

या नव्या वाचनालयामुळे पोर्ला परिसरातील शैक्षणिक वातावरण अधिक समृद्ध व प्रेरणादायी होईल. गावातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे युवक तसेच वाचनाची आवड असलेले नागरिक यांना ज्ञानवृद्धीसाठी आणि अभ्यासासाठी एक उत्कृष्ट सुविधा उपलब्ध होणार आहे. “ज्ञान हेच खरे बल” या भावनेतून उभारण्यात येत असलेला हा प्रकल्प शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवकांना प्रगतीचा नवा मार्ग दाखविणारा आणि त्यांच्या स्वप्नांना आकार देणारा केंद्र ठरेल.

यावेळी मार्गदर्शन करताना आमदार डॉ. नरोटे यांनी विकासाची नवी व्याख्या मांडली. ते म्हणाले, “गावांचा सर्वांगीण विकास फक्त रस्ते, वीज आणि पाणीपुरवठा यापुरता मर्यादित नसतो. तो तेव्हाच घडतो, जेव्हा गावात ज्ञान, संस्कृती आणि श्रद्धेची ज्योत प्रज्वलित होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरांप्रमाणेच शिक्षणाच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. त्यांच्या गावातच दर्जेदार वाचनालय उपलब्ध झाले, तर तोच विद्यार्थी स्वतःचे आणि गावाचे भविष्य घडवू शकतो. म्हणून अशा प्रकल्पांची गरज आहे.”

या भूमिपूजन सोहळ्याला भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, पोर्लाच्या सरपंच निवृत्ता राऊत, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, तसेच उपसरपंच सुजित राऊत,  दिप्ती कोरडे, गुरुदेव निमगडे, अजय चापले, अनिल चापले, रवींद्र सेलोटे, अभिजित कोरडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button