गोंदियाविदर्भ

हिवताप सहाय्यक संचालकांची जिल्हा हिवताप कार्यालयाला भेट

कीटकजन्य आजार, प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा घेतला आढावा

गोंदिया : नागपूर विभागाच्या हिवताप सहाय्यक संचालक डॉ. नयना दुपहारे यांनी गोंदिया जिल्हा हिवताप कार्यालयाला दिली. यावेळी त्यांनी जिल्हा हिवताप कार्यालयात जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण यांच्याकडून जिल्ह्यामध्ये कीटकजन्य व जलजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध कार्यक्रमांचा सखोल आढावा घेतला. हिवतापामुळे जिल्ह्यात एकही मृत्यू होऊ नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत त्यांनी यावेळी सूचना दिल्या.

डॉ. नयना दुपहारे यांनी पावसाळ्यात हिवताप, मेंदुज्वर, चिकनगुनिया, हत्तीपाय आणि डेंग्यू यांसारख्या जलजन्य व कीटकजन्य आजारांची रुग्णसंख्या कमी करण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्देश दिले.

आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रबोधन करणे, नियमित गृहभेटी देऊन सर्वेक्षण करणे, आणि तालुकास्तरीय हिवताप कार्यशाळांमधून आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा सेविका यांना प्रशिक्षित करणे. डासांची पैदास रोखण्यासाठी गावपातळीवर ग्रामपंचायतीच्या सहकार्याने उपाययोजना करणे, आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, हिवतापाबाबत प्रभावी पर्यवेक्षण ठेवणे, हिवताप रोखण्यासाठी जैविक बाबींचा वापर करणे, आणि प्रौढ डास कमी करण्याच्या विविध पद्धतींचा अवलंब करणे. हिवताप दूषित रुग्णांना त्वरित उपचार मिळावेत यासाठी उपाययोजना करणे. आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक औषधे, रक्ताच्या तपासणीसाठी स्लाइड्स, रॅपिड डायग्नोस्टिक किट आणि इतर आवश्यक साहित्याची उपलब्धता सुनिश्चित करणे. डासअळी नाशक पद्धतींचा प्रभावी वापर करणे, ग्रामपंचायतीच्या सहकार्याने संडास-बाथरूमच्या पाईपला व्हेंट जाळी बसवणे, फवारणी कार्यक्रम प्रभावीपणे राबवणे. आश्रमशाळेतील १०० टक्के विद्यार्थ्यांची रक्त तपासणी करणे. पत्ता सिझन (स्थलांतरित) लोकांची आरडीके किटने मलेरियाबाबत तपासणी करणे. शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना आरोग्य शिक्षण देणे, तसेच जिल्ह्याला लागून असलेल्या आंतरजिल्हा उपाययोजनांवर लक्ष देणे. कीटकजन्य आजाराबाबत जनजागृती साहित्य लोकांना दिसेल अशा ठिकाणी प्रदर्शित करणे. अशा विविध सूचना त्यांनी दिल्या.

या बैठकीत आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button