गडचिरोलीविदर्भ

आम आदमी पार्टीचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन, शिक्षण व्यवस्थेतील गंभीर त्रुटींकडे वेधले लक्ष

शिक्षकांच्या रिक्त जागा, कंत्राटी शिक्षकांच्या मानधनाचा प्रश्न आणि शाळांच्या दुरवस्थेवर बोट

गडचिरोली : जिल्ह्यातील शालेय शिक्षण व्यवस्थेतील गंभीर त्रुटींकडे लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पार्टी (AAP) ने सर्किट हाऊस येथे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांना निवेदन सादर केले. या निवेदनाद्वारे पक्षाने जिल्ह्यातील शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे, कंत्राटी शिक्षकांना वेळेवर मानधन न मिळणे, तसेच शाळांच्या जीर्ण इमारती आणि शौचालयांची दुरवस्था यांसारख्या प्रमुख समस्यांवर प्रकाश टाकला.

आम आदमी पार्टी ने केलेल्या पाहणीनुसार, जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या आणि शिक्षकांची संख्या यामध्ये मोठा फरक आहे. १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये दोन शिक्षक असताना, ३० पेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये केवळ एकच शिक्षक कार्यरत आहे. फेब्रुवारीपासून रखडलेली शिक्षक बदली प्रक्रिया आणि भरती प्रक्रियेमुळे शाळा सुरू होऊन ५० दिवस उलटले तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान सुरूच आहे. याचबरोबर, कंत्राटी शिक्षकांना अनियमित मानधनामुळे आर्थिक अडचणी येत आहेत, तर अस्वच्छ शौचालये आणि धोकादायक इमारतींमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता धोक्यात आली आहे.

निवेदनात, ‘आप’ने शिक्षणमंत्र्यांकडे तातडीने शिक्षकांची रिक्त पदे भरण्याची, कंत्राटी शिक्षकांना वेळेवर मानधन देण्याची आणि शाळांच्या पायाभूत सुविधांची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी केली. या समस्यांचे तात्काळ निराकरण न झाल्यास विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येईल, असा इशाराही पक्षाने दिला.

शिक्षणमंत्री भुसे यांनी निवेदन स्वीकारून या समस्यांवर लवकरच उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. ‘आप’चे जिल्हाध्यक्ष नसिर हाशमी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने या लढ्याला पाठिंबा दर्शवत शैक्षणिक सुधारणांची अपेक्षा व्यक्त केली. “शिक्षकांशिवाय शिक्षण अपूर्ण, रिक्त पदे भरा, शाळांना आधार द्या!” या घोषणेद्वारे ‘आप’ने आपला लढा तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला.

याप्रसंगी जिल्हा सचिव अमृत मेहेर, जिल्हा संघटक ताहिर शेख, संघटन मंत्री चेतन गहाणे आणि उमेश भांडेकर, शहर संघटक साहिल बोदेले, युवा संघटक इरफान पठाण आणि संतोष कोडापे यांच्यासह मोठ्या संख्येने कंत्राटी शिक्षक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button