गोंदियाविदर्भ

गोंदियात ‘शाश्वत शेती दिन’ साजरा, शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळण्याचे आवाहन

रासायनिक शेतीचे दुष्परिणाम टाळण्यासाठी तज्ज्ञांनी दिले मार्गदर्शन

गोंदिया : रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा अतिवापर कमी करून नैसर्गिक शेतीकडे वळणे काळाची गरज आहे, असा संदेश गोंदियात आयोजित ‘शाश्वत शेती दिन’ कार्यक्रमात देण्यात आला. डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या जयंतीनिमित्त कृषि विज्ञान केंद्र, हिवरा येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख विशाल उबरहांडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा कृषि विकास अधिकारी मनोज आसवले, उपविभागीय कृषि अधिकारी महेंद्र ठोकळे, शेतकरी शास्त्रज्ञ फोरमचे अध्यक्ष महेंद्र ठाकुर, किटकशास्त्र विभागाचे विषय विशेष तज्ञ आर.डी.चव्हाण, उद्यानविद्या विभागाचे विषय विशेष तज्ञ डॉ. विजय कोरे, दुग्ध व्यवसाय विभागाचे विषय विशेष तज्ञ श्रीमती सरप, तालुका कृषि अधिकारी गोंदिया नेहा आढाव, मंडळ कृषि अधिकारी दासगाव सुमित नंदनवार, उप कृषि अधिकारी टी.एस. तुरकर, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापन आत्मा गोंदिया सुनिल खडसे, सहायक कृषि अधिकारी रिंकु मंडल उपस्थित होते.

जिल्हा कृषी विकास अधिकारी मनोज आसवले यांनी रासायनिक खतांच्या अतिवापराने जमिनीची उत्पादन क्षमता घटत असल्याकडे लक्ष वेधले. पाण्याचे स्त्रोत आटत असल्यामुळे शाश्वत शेती करणे किती महत्त्वाचे आहे, हे त्यांनी समजावून सांगितले.

उपविभागीय कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे यांनी शेतकऱ्यांना स्थानिक हवामानानुसार पिकांची निवड करावी, पिकांची फेरपालट करावी आणि कमी पाणी लागणाऱ्या पिकांची लागवड करावी, असा सल्ला दिला. यामुळे पाण्याची बचत होईल आणि उत्पादनही चांगले मिळेल, असे ते म्हणाले.

शेतकरी शास्त्रज्ञ फोरमचे अध्यक्ष महेंद्र ठाकुर यांनी भातशेतीला जास्त पाणी लागत असल्यामुळे शेतकऱ्यांनी भाजीपाला आणि फळबागांची लागवड करण्याचा विचार करावा, असे सांगितले. तसेच त्यांनी माती परीक्षण आणि जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवण्याचे फायदेही सांगितले. पुढील वर्षी हा कार्यक्रम शेतकऱ्यांच्या शेतावर आयोजित करावा, अशी सूचनाही त्यांनी केली.

या कार्यक्रमाला गोंदिया तालुक्यातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सुनील खडसे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button