
गडचिरोली : ओबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ओबीसींसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू करण्यात येणार आहे. गडचिरोलीतही १५ ऑगस्टपासून हे वसतिगृह सुरू होणार आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी १६ जुलै रोजी आढावा घेतला, यावेळी समाजकल्याणचे सहायक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी ही माहिती त्यांना दिली.
राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर हे १६ जुलैला जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबूराव कोहळे, रमेश भुरसे आदींनी ओबीसी वसतिगृहासंदर्भात त्यांना निवेदन देऊन चर्चा केली. प्रशांत वाघरे यांनी वसतिगृहात ओबीसी प्रवर्गातील सर्वच शाखांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावेत, अशी मागणी केली. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना या वसतिगृहात प्रवेश मिळायला हवा, अशी मागणी त्यांनी केली. वसतिगृह सुरू करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतली, त्यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे वाघरे यांनी सांगितले. यावेळी प्रशांत वाघरे यांनी जिल्ह्यातील ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती व इतर अडचणी मांडल्या.
यावेळी समाजकल्याणचे सहायक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांच्याकडून त्यांनी आढावा घेतला. जिल्ह्यात मुलींसाठी व मुलांसाठी दोन वसतिगृहे येत्या १५ ऑगस्टपासून सुरू करण्याचे नियोजन केले आहे. यासाठी वेगवेगळ्या दोन ठिकाणी इमारती भाडे तत्त्वावर घेण्यात आल्या आहेत. शासकीय निकषानुसार सर्व सोपस्कार पार पडले असून वसतिगृहाच्या प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती डॉ. मडावी यांनी दिली. वसतिगृहासाठी अर्ज करण्याची ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.



