
विविध सरकारी योजनांची माहिती व साधनांचे वाटप
गडचिरोली : तालुक्यातील कोटगल येथे २६ मे रोजी मत्स्यव्यवसाय विभागामार्फत आयोजित विविध योजनांच्या जनजागृती कार्यक्रमाला मच्छिमारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात राष्ट्रीय मत्स्य विकास प्लॅटफॉर्म नोंदणी, किसान क्रेडिट कार्ड योजना, प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी योजना, ई-श्रम योजना, अपघात गटविमा योजना, तसेच मासेमारी साधनांसाठी अर्थसाहाय्य आदी महत्त्वाच्या योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. या शिबिरामुळे स्थानिक मच्छिमारांना मोठा आधार मिळाला आहे.
या कार्यक्रमात कोटगलसह मुरखळा, मुडझा, हिरापूर आणि येवली येथील मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांचे सभासद आणि स्थानिक मत्स्यव्यवसायिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमात मत्स्य व्यवसायासाठी आवश्यक असलेली माहिती प्रत्यक्ष प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शनाद्वारे देण्यात आली, ज्यामुळे उपस्थित मच्छिमारांना तांत्रिक आणि व्यावहारिक ज्ञान मिळाले.
या विशेष कार्यक्रमात मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त समीर डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील पाच सहकारी संस्थांना नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत मासळी बीज, खाद्य, जाळी, क्रेट्स, बर्फ पेटी आणि कॅनव्हास तंबू यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे स्थानिक स्तरावर मत्स्यव्यवसायाला बळकटी मिळून रोजगारनिर्मितीस चालना मिळणार असल्याचे सांगण्यात आले. NFDP पोर्टलवर प्रत्यक्ष नोंदणीसाठी मत्स्य विभागाच्या पथकाने उपस्थित व्यावसायिकांना सहाय्य केले, ज्यामुळे त्यांना योजनेचा लाभ घेणे सुलभ झाले. उपस्थितांनी योजनेचा लाभ घेण्याबाबत उत्साही सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी अ.ज्ञा. सोनोन, वरिष्ठ लिपिक योगेश रोकमवार, कनिष्ठ लिपिक विनोद कुनघाडकर आणि राहुल मेश्राम, डाटा एन्ट्री ऑपरेटर किशोर मोगरकर, मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षणार्थी भूषण साखरे तसेच स्थानिक मत्स्य सहकारी संस्थांचे पदाधिकारी आणि सदस्यांचे मोलाचे योगदान लाभले.



