गडचिरोलीविदर्भ

खड्डे बुजविण्यासाठी अपर जिल्हाधिकारी उतरले रस्त्यावर

अधिकाऱ्यांना निर्देश ; बांधकाम विभागाची यंत्रणा लावली कामाला

गडचिरोली : मुसळधार पावसाने जिल्ह्यातील नद्या आणि नाल्यांना पूर आला आहे. रस्त्यांचीही अक्षरशः चाळण झाल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. नागरिकांचे है हाल थांबविण्यासाठी अहेरीचे अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे हे संबंधित विभागाचे अधिकारी आणि यंत्रससामुग्री घेऊन पावसात खड्डे बुजविण्याच्या कामाला लागले.

अहेरी या तालुकास्थळापासून हाकेच्या अंतरावर वांगेपल्ली है गाव आहे. या गावाजवळच्या नदीवर पूल असून, तो महाराष्ट्र आणि तेलंगाणा या दोन राज्यांना जोडतो. याच पुलावरुन तेलंगणा राज्यातील कुमरमभीम जिल्ह्यातील बसेससुद्धा अहेरीपर्यंत येतात. परंतु या पुलाजवळच्या रस्त्यावर भला मोठा खड्‌डा पडून त्याला छोट्या डबक्याचे स्वरुप आले होते. या खड्ड्यातून वाहने काढताना खड्डा किती खोल आहे, याचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. ही परिस्थिती लक्षात घेता अहेरीचे अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी अलीकडेच घेतलेल्या आढावा बैठकीत खड्‌डा बुजविण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते. परंतु संबंधित विभागाने खड्डा बुजवला नाही. अखेर भाकरे यांनी सोमवार, २३ जुलैच्या संध्याकाळी वांगेपल्ली गावाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आणि सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागाला खड्‌डा बुजविण्याची सक्त ताकीद दिली.

सकाळी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी जेसीबी, ट्रॅक्टर आणि अन्य यंत्रसामुग्री घेऊन खड्डे बुजविण्यासाठी वांगेपल्ली गावात गेले. यावेळी ऑन द स्पॉट उभे राहून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्यावरच अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे हे त्या ठिकाणाहून परतले. काम पूर्ण झाले आणि नागरिकांनी आकरे यांचे मनोमन आभार मानले.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बडवंत रामटेके, जिल्हा परिषद बांधकाम विभाग अहेरीचे उप अभियंता रविकिरण पारेलवार, महावितरणचे कार्यकारी अभियंता सुधीर हेडाऊ, मंडळ अधिकारी एकनाथ चांदेकर, तलाठी सचिन मडावी उपस्थित होते.

अहेरीच्या अपर जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत अहेरी, सिरोंचा, एटापल्ली व भामरागड या चार तालुक्यांचा समावेश होतो. या चारही तालुक्यांतील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विजय भाकरे यांनी विविध ठिकाणी असलेले खड्डे बुजविण्याचे निर्देश दिले. शिवाय अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा, गावात फवारणी करा, हातपंप, विहिरी आदी पिण्याच्या पाण्याचे स्रोत स्वच्छ करा, विद्युत प्रवाह सुरळीत ठेवा, असे निर्देशही भाकरे यांनी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button