आरोग्यगोंदियाविदर्भ

ग्रंथोत्सवात साहित्यासोबतच आरोग्याचा जागर; ‘अरुणोदय सिकलसेल’ जनजागृती दिंडीने वेधले लक्ष

पुस्तकांच्या पालखीसोबतच सिकलसेल मुक्तीचा संदेश; विद्यार्थ्यांच्या पारंपारिक वेशभूषेने वाढविली दिंडीची शोभा

गोंदिया : स्थानिक ग्रंथोत्सव २०२५ निमित्त आयोजित भव्य ग्रंथ दिंडीत केवळ साहित्याचाच नव्हे, तर सामाजिक आरोग्याचाही जागर पाहायला मिळाला. ‘अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियाना’ अंतर्गत या दिंडीत करण्यात आलेल्या प्रभावी जनजागृती उपक्रमाने उपस्थित सर्व नागरिक आणि मान्यवरांचे लक्ष वेधून घेतले. पुस्तकांच्या सोबतीला आरोग्याचा संदेश देणारा हा संगम गोंदियाकरांसाठी कौतुकाचा विषय ठरला.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, या दिंडीत जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, दतोरा येथील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. पारंपारिक वेशभूषा परिधान केलेल्या या चिमुकल्यांनी हातात सिकलसेल जनजागृतीचे फलक आणि बॅनर धरले होते. “तपासणी करा, निदान करा आणि उपचार वेळेवर मिळवा” अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी शहरात सिकलसेल आजाराबद्दल जनजागृती केली.

ग्रंथ दिंडीतील या सामाजिक उपक्रमाला रामदास साठे (सहायक ग्रंथालय संचालक, नागपूर), डॉ. गजानन कोटेवार (अध्यक्ष, राज्य ग्रंथालय संघ), शिवकुमार शर्मा (अध्यक्ष, जिल्हा ग्रंथालय संघ), डी. डी. रहांगडाले (सचिव) व मिनाक्षी कांबळे (जिल्हा ग्रंथालय अधिकारी), अस्मिता मनपे (ग्रंथालय निरीक्षक), विजय आखाडे व प्रशांत खरात यांच्यासह आरोग्य व शिक्षण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

सिकलसेल हा प्रामुख्याने अनुवांशिक आजार असून, ग्रामीण आणि दुर्गम भागात त्याचे प्रमाण अधिक आढळते. हा आजार रोखण्यासाठी आणि रुग्णांना वेळीच उपचार मिळवून देण्यासाठी १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ‘अरुणोदय’ हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. ग्रंथोत्सवासारख्या सांस्कृतिक व्यासपीठाचा वापर करून ही माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा यशस्वी प्रयत्न प्रशासनाने केला आहे.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दतोरा शाळेचे मुख्याध्यापक मुनेश्वर चौधरी यांच्यासह शिक्षक येसुलाल बिसेन, निशा वासनिक यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे सिकलसेल आजाराबद्दलची भीती दूर होऊन नागरिकांमध्ये तपासणीसाठी सकारात्मकता निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून केवळ वाचन संस्कृतीच नाही, तर सशक्त समाजासाठी आरोग्याचे विचारही पेरले जावेत, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button