
गडचिरोली : एकीकडे अवैध दारूविक्रीचे आव्हान उभे असताना, गडचिरोली तालुक्यातील मारोडा गावाने सलग ६ वर्षे यशस्वीरीत्या दारूविक्रीबंदी टिकवून धरत जिल्ह्यासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. या यशाचे प्रतीक म्हणून ग्रामस्थांनी गावात ‘विजयस्तंभ’ सुद्धा उभारला आहे.
गडचिरोली शहरापासून अवघ्या १६ किमी अंतरावर असलेल्या ९०० लोकसंख्येच्या या गावात पूर्वी शांतता होती. मात्र, २०१९ च्या सुमारास गावात अवैध दारूविक्री सुरू झाली आणि भांडण-तंट्यांमुळे गावची सुव्यवस्था धोक्यात आली. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ग्रामसभेने दारूविक्रीबंदीचा अधिकृत ठराव घेतला. मुक्तीपथ’ गाव संघटना, ग्रामपंचायत आणि तंटामुक्त समितीने (तमुस) पुढाकार घेऊन दारू विक्रेत्यांविरुद्ध प्रत्यक्ष संघर्ष सुरू केला. दारू विक्रेत्यांचा साठा पकडणे आणि पोलिसांच्या मदतीने कायदेशीर कारवाई करून विक्री पूर्णपणे बंद पाडली.
गावातील ही बंदी टिकवून ठेवण्यासाठी संघटना मजबूत करण्यात आली. युवकांना या मोहिमेत जोडण्यासाठी गावात विशेष मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. केवळ बंदी न घालता, व्यसनी व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी व्यसन उपचार शिबिरे घेण्यात आले. सलग ६ वर्षांपासून गावात शांतता व सुव्यवस्था नांदत आहे. दारू बंद झाल्यामुळे गरीब कुटुंबांची आर्थिक बचत होत असून कौटुंबिक कलह कमी झाले आहेत. या गौरवशाली प्रवासाची आठवण म्हणून गावात विजयस्तंभ उभारण्यात आला आहे. मारोडा गावातील ही दारूविक्रीबंदी कायमस्वरूपी टिकून राहावी, यासाठी मुक्तीपथची चमू सातत्याने ग्रामस्थांना मार्गदर्शन करत आहे. गावच्या एकजुटीमुळेच हे यश शक्य झाले आहे.



