क्राईमगडचिरोलीविदर्भ

नक्षल सप्ताहाच्या पूर्वसंध्येला एका वरिष्ठ जहाल महिला नक्षलीचे आत्मसमर्पण

शासनाने जाहिर केले होते ०८ लाखांचे बक्षीस

गडचिरोली : शासनाने सन २००५ पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ नक्षलवाद्यांसह अनेक जहाल नक्षलवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित नक्षलवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण ६७१ नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. २७ जूलै २०२४ रोजी एका वरिष्ठ जहाल महिला नक्षलवाद्याने गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण केले. रिना बोर्रा नरोटे ऊर्फ ललीता (वय ३६) रा. बोटनफुंडी, ता. भामरागड, असे तिचे नाव आहे. तिच्यावर आठ लाखांचे बक्षीस होते.

नक्षलवाद्यांच्या गडचिरोली विभागाला संपूर्ण साहित्य पुरविण्याची जबाबदारी तिच्यावर होती. रिना बोर्रा नरोटे ऊर्फ ललीता २००६ मध्ये पेरमिली दलममध्ये भरती झाली. २००७ पासुन सप्लाय टिम सदस्य म्हणून काम करण्यास सुरुवात केली. २००७-२००८ मध्ये शिवणकला, कापड कींग व शिलाई मशिन चालविण्याचे तिने प्रशिक्षण घेतले. २००८-१४ मध्ये टेलरींग टिममध्ये सदस्य पदावर कार्यरत होती. २०१४ मध्ये टेलर टिममध्ये कमांडर पदावर बढती होऊन आजपर्यंत कार्यरत होती. २०२० मध्ये पेरमिली भट्टी जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये तिचा प्रत्यक्ष सहभाग होता. २०१९ मध्ये नैनवाडी जंगल परिसरात झालेल्या एका निरपराध इसमाच्या खुनात तिचा प्रत्यक्ष सहभाग होता. तिच्यावर शासनाने आठ लाखाचे बक्षीस ठेवले होते. आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन रिना बोर्रा नरोटे ऊर्फ ललीता हिला ५.५ लाख रुपये देण्यात येणार आहे.

गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने नक्षलवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन २०२२ ते २०२४ सालामध्ये आतापर्यंत एकुण २३ जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सदर कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर संदिप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल व सिआरपीएफ ०९ बटालियनचे कमांडंट शंभु कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button