गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

जिल्ह्यात १ जूनपासून सरासरीपेक्षा ३७६ मिमी जास्त पाऊस

४० मार्गांवरील वाहतूक ठप्प ; जनजीवन विस्कळीत

गडचिरोली : जिल्ह्यात आज सकाळपासून दिवसभर पाऊस सुरुच असल्याने जनजीवन विस्कळीत झाले. पुरामुळे गडचिरोली-चामोर्शी आणि आलापल्ली-भामरागड या मार्गांसह जिल्ह्यातील ४० मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. जिल्ह्यात १ जूनपासून आजपर्यंत सरासरीपेक्षा ३७६ मिलिमीटर जास्त पाऊस पडला आहे.

मागील चोवीस तासांत धानोरा तालुक्यात सर्वाधिक १५४.२ मिलिमीटर पाऊस पडला. त्याखालोखाल गडचिरोली तालुक्यात १२०.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात १ जूनपासून आजपर्यंत सरासरी १६२.९ टक्के पाऊस पडला आहे. अपेक्षित पर्जन्यमानापेक्षा ३७६ मिलिमीटर पाऊस जास्त पडला आहे.

शनिवार, २७ जुलैला हेमलकसा-भामरागडदरम्यानच्या पुरात अडकलेले ३५ नागरिक आणि ३ मुलांना एसडीआरएफ आणि महसूल विभागाच्या पथकाने सुरक्षितरित्या बाहेर काढले. शिवाय गडचिरोली तालुक्यातील रानमूल येथे पुराने वेढलेल्या २ व्यक्तींचेही प्राण वाचविण्यात आले. दरम्यान २७ जुलैला गोसेखुर्द धरणातून ४७ लाख क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग होत होता. आज तो अडीच लाख क्यूमेक्स करण्यात आला असून, पुन्हा वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे गडचिरोली-नागपूर मार्ग पुन्हा बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तिकडे तेलंगणातील मेडीगड्‌डा धरणातून सतत मोठा विसर्ग होत असल्याने शेकडो हेक्टर शेती पाण्यात गेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button