
आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त श्रमिकांचा गौरव
कुरखेडा : समाजाच्या आर्थिक, कृषी आणि सहकारी व्यवस्थेचा कणा असलेल्या हमाल कामगारांचे योगदान अनन्यसाधारण आहे. त्यांच्या श्रमाचा सन्मान करणे हीच सहकाराची खरी परंपरा आहे, असे प्रतिपादन आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था पदाधिकारी-कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये यांनी केले.
आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त कुरखेडा येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या वतीने हमाल कामगारांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बाबुराव तुलावी होते. यावेळी सहकार चळवळीचे महत्त्व, श्रमिकांच्या सन्मानाची गरज आणि कृषी व बाजार व्यवस्थेमध्ये हमाल बांधवांचे असलेले मोलाचे योगदान, यावर मान्यवरांनी सविस्तर मार्गदर्शन केले. सहकाराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथींच्या हस्ते हरदेव उईके, लोकनाथ राऊत, अमरसिंग राऊत, अमीर राऊत, प्रतीक राऊत, जितेन पायपुल, मुकेश कपूर, गुरुदेव नेवारे, रामअवतार नैताम, आकाश मेश्राम, विनायक वटी, किशोर नागोसे, सचिन उपमडे, मोरेश्वर कवडो, किर्तराम कोसरे, राजेश नागोसे, अनिल तुलावी, विकास गावळे, सुमित तुलावी, महेंद्र नैताम, शेखर तुलावी आदी हमाल कामगार बांधवांचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी आदिवासी विकास महामंडळाचे संचालक गोपाल उईके, यशवंतराव चौरीकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती व्यंकटी नागीलवार, शेतकरी नेते घीसू खुणे, संचालक विनोद खुणे, हेमंत शेंद्रे, प्रभाकर जुमनाके यांच्यासह संस्थेचे संचालक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद नागपूरकर यांनी केले, प्रास्ताविक हेमंत शेंद्रे यांनी केले, तर आभार व्यवस्थापक लीलाराम घोसेकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे व्यवस्थापक, कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.



