
मरारटोली बस स्थानकाजवळील घटना ; ९६ हजारांचा मुद्देमाल जप्त
गोंदिया : रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत मरारटोली परिसरात रेल्वे स्थानकावरून परतणाऱ्या दोन तरुणांना मारहाण करून लुटणाऱ्या तिघांना पोलिसांनी अवघ्या काही तासांत गजाआड केले आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेले मोबाइल आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण ९६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कार्तिक तिलक पंचेश्वर (२५, रा. वाराशिवनी) हा तरुण शुक्रवारी रात्री आपला मित्र राकेश अडमाची याला गोंदिया रेल्वे स्थानकावर सोडण्यासाठी आला होता. मात्र, ट्रेन रद्द झाल्याने दोघेही आपल्या मोटारसायकलने वाराशिवनीकडे परतत होते. मरारटोली बस स्थानकाजवळ त्यांची मोटारसायकल पंक्चर झाल्याने ते थांबले असता, अज्ञात तिघांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपींनी तरुणांचे दोन मोबाइल फोन आणि ८०० रुपये रोख जबरदस्तीने हिसकावून पोबारा केला होता.
या घटनेची गंभीर दखल घेत रामनगर पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता कलम ३०९ (६) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मयूर देवेंद्र श्यामकुवर (२६, रा. गौतमनगर), सौरभ उर्फ वाकडी प्रकाश ढोमणे (२०, रा. गौतमनगर) आणि संघरत्न दिलीप मेश्राम (२४, रा. सिंगलटोली) या तिघांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून लुटलेले दोन मोबाइल आणि गुन्ह्यात वापरलेली ८५ हजार रुपये किमतीची मोटारसायकल असा एकूण ९६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनात अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन गुल्हाने, पोलिस निरीक्षक तिरुपती राणे, संजय नागरगोजे, दीपक ठाकरे तसेच डीबी पथक आणि वाहतूक शाखेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केली.



