क्राईमगडचिरोलीविदर्भ

रोपवनासह रोहयोच्या कामात घोळ ; वनपरिक्षेत्र अधिकारी निलंबित

चातगाव वनपरिक्षेत्रात गैरव्यवहार

गडचिरोली : चातगाव वनपरिक्षेत्रात करण्यात आलेली रोपवन लागवड, खोदतळे, रोहयोची कामे, वाघांच्या संवर्धनासह अन्य कामांमध्ये घोळ केल्याप्रकरणी आरएफओ एस.बी. पडवे यांना निलंबित करण्यात आले आहे. या कामांची तक्रार वरिष्ठांपर्यंत झाल्यानंतर त्या कामांची चौकशी करण्यात आली. त्यात पडवे यांनी गडबड केल्याचे दिसून आले.

गडचिरोली वनवृत्तातील वनविभाग गडचिरोलीअंतर्गत चातगाव वनपरिक्षेत्राचा समावेश होतो. मार्च 2021 ते 2024 पर्यंत करण्यात आलेली रोपवन लागवड, हेक्टरी मोजमाप, हेक्टरी लावण्यात आलेली झाडे आणि जगविलेली झाडे, प्रत्यक्ष लागवड न करता पैशाची उचल करणे असे अनेक आरोप ठेवत भारतीय जनसंसदचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांनी तक्रार केली होती. प्रत्येक कामावर लावलेल्या मजुरांचे व्हाऊचर, मजुरांच्या सह्यांची खात्री करणे, मोजमाप पुस्तिका, प्रत्येक मजुराची प्रत्येक कामावरील बँक खाते पुस्तिका तपासून घेतल्यास हा घोळ स्पष्टपणे दिसणार असल्याचे त्यांनी वनमंत्री, वन सचिवांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले होते. याशिवाय साहित्य खरेदीमधील कोटेशन, जीएसटीची बिले तपासण्याची मागणी केली होती. वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांच्या निर्देशावरून वनरक्षक, वनपालांनी अनेक कामांवर अनेक बोगस मजूर दाखवून शासकीय निधी हडप केला असल्याची चर्चा होती. याशिवाय चातगाव वनपरिक्षेत्रात अतिक्रमण, अवैध उत्खनन, वृक्षतोडही झाल्याचा संशय होता.

दरम्यान आरएफओने वनपालामार्फत आपल्याला लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी, अशीही मागणी खरवडे यांनी केली होती. दरम्यान मुख्य वनसंरक्षक एस.रमेशकुमार यांनी या तक्रारीची वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी केली. त्यात पडवे दोषी आढळले. प्रधान सचिवांच्या निर्देशानुसार निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button