
साकोली : येथून आठ किलोमीटर असलेल्या तुडमापुरी येथे सकाळी फिरायला गेलेल्या मुलीवर बिबट्याने अचानक हल्ला केला. यात ती जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ६:३० वाजता घडली आहे. धनश्री टेकराम घोरमारे असे जखमी मुलीचे नाव असून ती फक्त ८ वर्षांची आहे.
घोरमारे कुटुंब नेहमी व्यायामासाठी सकाळी जवळच असलेल्या असलेल्या पाठदेव पहाडीजवळ फिरायला जात असतात. नेहमीप्रमाणे मंगळवारीही ते फिरायला निघाले होते. आई- वडिलांसमोर मुलगी धनश्री मागे चालत होती होती. यातच बिबट्याने संधी साधून अचानक तिच्यावर हल्ला केला. एकाएकी झालेल्या हल्ल्यामुळे ती घाबरली, जमिनीवर पडली. बिबट्याने तिच्यावर हल्ला केला व तिला खाली पाडले; परंतु तिने हिंमत दाखवून प्रतिकार केला. त्यामुळे तिच्या मानेला त्याला पकडता आले नाही. हा प्रकार लगेच लक्षात घेताच पुढे चालत असलेल्या मुलीच्या वडिलांनी हातातील पाण्याची बाटली बिबट्याला फेकून मारली. तो पळून गेल्याने मोठा अनर्थ टळला.
किरकोळ जखमी झालेल्या धनश्रीला साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जखमी बालिकेची भेट घेऊन तिच्या पालकांकडून माहिती जाणून घेतली. सदर ठिकाण हे नागझिरा बफर झोनमधील असल्याने या भागात वन्य प्राण्यांचा वावर असतो. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, या भागात फिरणे टाळावे, असे आवाहन वन विभागाने केले आहे.



