गडचिरोलीविदर्भ

गडचिरोली आता स्वतंत्र डाक विभाग ; १५ जुलैपासून नवी व्यवस्था होणार लागू

१५ जुलै रोजी टपाल, बँकिंग व विमा सेवा बंद; १६ जुलैपासून नियमित कामकाज सुरू

गडचिरोली : जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. या निर्णयानुसार गडचिरोली आता स्वतंत्र डाक विभाग म्हणून कार्यरत होणार असून ही नवीन प्रशासकीय व्यवस्था बुधवार, १५ जुलै पासून लागू होणार आहे.

या प्रशासकीय पुनर्रचनेमुळे गडचिरोली जिल्ह्यातील सर्व डाक कार्यालये स्वतंत्र गडचिरोली विभागीय प्रमुखांच्या नियंत्रणाखाली येणार आहेत. या निर्णयामुळे प्रशासकीय कार्यक्षमता वाढण्यास, नागरिकांच्या तक्रारींचे जलद निवारण होण्यास तसेच डाक, आर्थिक आणि डिजिटल सेवांचा अधिक प्रभावी लाभ नागरिकांना मिळण्यास मदत होणार आहे.

नवीन व्यवस्थेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दि. १५ जुलै २०२६ रोजी गडचिरोली टपाल विभागांतर्गत सर्व टपाल, बचत बँक आणि टपाल जीवन विमा यांसह सर्व प्रकारचे व्यवहार पूर्णपणे बंद राहतील. त्यानंतर दि. १६ जुलै २०२६ पासून सर्व सेवा पूर्ववत नियमितपणे सुरू करण्यात येणार आहेत.

या विभाजनामुळे गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना प्रशासकीय कामांसाठी चंद्रपूर येथे जाण्याची आवश्यकता राहणार नाही. स्थानिक स्तरावरच विविध टपाल, बचत बँक, विमा आणि इतर सेवा अधिक वेगाने उपलब्ध होणार असल्याने नागरिकांचा वेळ व खर्चही वाचणार आहे.

डाक विभागाने स्पष्ट केले आहे की, प्रशासकीय बदलानंतर दैनंदिन टपाल वितरण, बचत बँक सेवा, विमा सेवा आणि इतर ग्राहकाभिमुख सुविधा अधिक सक्षम व कार्यक्षम पद्धतीने उपलब्ध करून दिल्या जातील. अधिक माहितीसाठी किंवा सेवा सहाय्यासाठी नागरिकांनी चंद्रपूर विभागाच्या ०७१७२-२५५३३७ या दूरध्वनी क्रमांकावर अथवा sspcdp.mah@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा. तसेच गडचिरोली विभागाशी spgde.mah@gmail.com या ई-मेलद्वारे संपर्क साधता येईल, असे वरिष्ठ डाक अधीक्षक, चांदा विभाग, चंद्रपूर एस. रामा कृष्णा यांनी कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button