
गोंदिया : रानातील भाजी तसेच शेतशिवारातील उगवल्या जाणाऱ्या भाज्याचे आहारातील महत्व व औषधी गुणधर्माबाबत तसेच पौष्टीक तृणधान्याचे महत्व व आरोग्य विषयक माहीती सर्वसाधारण नागरीकांना होण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरिय रानभाजी प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे आयोजन कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांचे वतीने 12 ऑगस्ट रोज सोमवारला सकाळी 10.00 ते 5.00 या वेळेत नविन प्रशासकिय इमारत, जयस्तंभ चौक गोंदिया येथे केले आहे.
जिल्ह्यातील जैवविविधता व राजभाज्या याचे आकर्षण निसर्गाशी जवळीकता साधणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये असते. रानभाज्या या केवळ आहार आणि चवीशीच निगडीत नसून अनेक औषधी गुणतत्वे राजभाज्यांमध्ये दडलेली असून पिढ्यांपिढया पासून याच्या सेवनाला आपण अधिक महत्व देतो. प्रत्येकापर्यंत हा रानमेवा उपलब्ध व्हावा व शेतकरी गटांना या रानभाज्यांच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहचण्याची संधी मिळावी या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
12 ऑगस्ट रोजी हा महोत्सव प्रशासकीय इमारती जयस्तंभ चौक गोंदिया येथे संपन्न होणार आहे. या महोत्सवासाठी स्टॉल्सची व्यवस्था केली जात असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी पवन मेश्राम यांनी दिली आहे. या रानभाजी महोत्सवात केना, कुंजरु, खापरखुटी, पाथरी, कपाळफोडी, टाकळा/तरोटा, मायाळू भाजी, कुरडुची भाजी, शेवळा, करटोली, काटेमाठ, हादगा, दिंडा भाजी, शेवगा, अघाडा, कमळून भाजी, आंबाडी भाजी, तसेच हंगामी फळे येथे ग्राहकांना मिळतील.
मानवी जिवनामध्ये सकस अन्नाचे अनन्य साधारण महत्व आहे. रानभाज्यामध्ये शरीराला आवश्यक असणारे अन्न घटक, जिवनसत्वे व खनिजे आणि औषधी गुणधर्म जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे रानभाज्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहेत. सकस आहारा मध्ये विविध रानभाज्यांचा/फळांचा समावेश करणे आवश्यक आहे. या विषयी या महोत्सवात मार्गदर्शन सुद्धा केले जाणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घेऊन शेतकरी गटांना अप्रत्यक्ष मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.



