गडचिरोलीविदर्भ

झाडापापडा इलाका महाग्रामसभेचा पुढाकार; ३७ पैकी ३४ गावांत दारूविक्रीबंदी यशस्वी

धानोरा : तालुक्यातील पेंढरी परिसरातील पारंपरिक ‘झाडापापडा इलाका महाग्रामसभा’ समितीने अवैध दारूविक्रीविरुद्ध आक्रमक पाऊल उचलले आहे. १६ एप्रिल रोजी पयडी येथे पार पडलेल्या महत्त्वपूर्ण पाठपुरावा बैठकीत इलाख्यातील ३७ पैकी ३४ गावांनी आपल्या ग्रामसभेत दारूविक्रीबंदीचा ठराव घेऊन तो यशस्वीपणे अंमलात आणल्याची माहिती समोर आली आहे. तसेच उर्वरित तीन गावांमध्ये तत्काळ ठराव घेऊन अवैध दारूविक्री बंद करा, अन्यथा इलाका समितीच्या वतीने कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

या बैठकीत प्रामुख्याने ज्या गावांमध्ये अद्यापही अवैध दारूविक्री सुरू आहे, त्या विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. उर्वरित पळसगाव, ढोरगट्टा आणि पेंढरी या गावांना वारंवार सूचना देऊनही अद्याप ग्रामसभेत दारूविक्रीबंदीचा ठराव घेण्यात आला नाही. या गावांवर आता समितीचे विशेष लक्ष असून संबंधित ग्रामसभांसाठी नोटीस काढण्यात आली आहे. नोटीस देऊनही विक्री बंद न केल्यास, इलाखा समिती स्वत:हून कडक कायदेशीर पावले उचलणार असल्याचे बैठकीत जाहीर करण्यात आले.

या बैठकीला इलाखा अध्यक्ष मैनु धुर्वे, उपाध्यक्ष धनेश पवार, सचिव बाजीराव पोटावी, माजी इलाखा प्रमुख राणू गावडे, कोषाध्यक्ष माणिक हिचामी, सल्लागार अध्यक्ष देवसाय आतला यांच्यासह ३७ गावांतील ग्रामसभा अध्यक्ष, सचिव, गाव पाटील, भूमिया आणि इलाखा समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच मुक्तीपथची तालुका टीमही या मोहिमेत सहभागी होती.

पारंपारिक इलाखा समितीच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचे हे मोठे पाऊल असून, संपूर्ण परिसर व्यसनमुक्त करण्याचा आमचा निर्धार आहे.

— इलाखा समिती पदाधिकारी

मुक्तीपथ तर्फे इलाका समितीचे अभिनंदन

पारंपारिक इलाखा समितीच्या अंतर्गत ३७ गावांपैकी ३४ गावांमध्ये घरगुती आणि अवैध दारूविक्री पूर्णपणे बंद करण्यात यश आले आहे. या यशाबद्दल ‘मुक्तीपथ’ अभियानाच्या वतीने समिती सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button