
दारूबंदीसाठी मन्नेराजाराम ग्रामस्थांचा पुढाकार; गावसभेत ठराव पारित
गडचिरोली: भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम भागातील मन्नेराजाराम गावातील ग्रामस्थांनी मुक्तिपथ अभियानाअंतर्गत एक महत्त्वाचा निर्णय घेत गावात दारूबंदीचा ठराव मंजूर केला आहे. या ठरावानुसार, गावात अवैध दारूविक्री करताना आढळल्यास संबंधित व्यक्तीला २०,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल. दारूमुळे गावामध्ये निर्माण होणाऱ्या समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे.
मन्नेराजाराम येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत हा ऐतिहासिक ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी मुक्तिपथ गाव संघटना स्थापन करण्यात आली आहे. या सभेत केवळ दारूविक्रीच नव्हे, तर दारूसंदर्भात अनेक नियम निश्चित करण्यात आले. यामध्ये गावात अवैध दारू विक्री केल्यास 20 हजार रुपये दंड, दारू विक्रेत्याची माहिती देणाऱ्यास 5 हजारांचे बक्षिस देण्याचे ठरविले. गावातील किराणा दुकान ५ किलोपेक्षा जास्त गुळ आढळल्यास गुळ जप्त करण्याचे ठरविले. गावात दारु पिऊन रस्त्यावर फिरत शिवीगाळ केल्यास 1000 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येईल. सोबतच दारूविक्रेत्यांना रोहयो व इतर योजनेचा लाभ मिळणार नाही, आदी निर्णय घेण्यात आले.
या महत्त्वपूर्ण सभेला पोलीस पाटील क्रिष्णा सिडाम, माजी सभापती ईदलशाह मडावी, पेसा ग्रामसभा अध्यक्ष रामपुरी पातर, मुक्तिपथ गाव संघटना अध्यक्ष अनिल मडावी, उपाध्यक्ष ताराबाई पेंदाम, तसेच दशरथ चांदेकर, वारलुजी चांदेकर, चंद्रकला झाडे, राजेश मडावी, सुरेश आसाम, तालुका संघटक निळा किन्नाके, स्पार्क विद्यार्थी कार्यकर्ते आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



