ड्रायव्हिंग स्कुलच्या वाहनावरच चाचणी घ्या – परिवहन आयुक्त भीमनवार यांचे आदेश

बोगस चाचण्यांवर लागणार लगाम
गडचिरोली : ड्रायव्हिंग स्कूलमार्फत येणाऱ्या उमेदवाराची चाचणी संबंधित ड्रायव्हिंग स्कूलच्या वाहनावरच घेण्याचे आदेश परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी दिले आहेत. त्यामुळे आता ड्रायव्हिंग स्कूल चालकांमार्फत पक्क्या वाहन परवानांसाठी घेण्यात येणाऱ्या बोगस ड्रायव्हिंग चाचण्यांवर निर्बंध येणार आहेत.
मोटर वाहन कायद्यानुसार सार्वजनिक रस्त्यावर वाहन चालविण्यासाठी परवाना घेणे आवश्यक आहे. विभागाकडून परिवहन वाहन चालविण्यासाठी अगोदर शिकाऊ (लर्निंग) आणि नंतर पक्के वाहन चालविण्याचा परवाना दिला जातो. पक्के वाहन परवाना देण्यापूर्वी परिवहन विभागाकडून ड्रायव्हिंग चाचणी घेतली जाते. मात्र, बनावट ड्रायव्हिंग चाचणीच्या आधारे वाहन परवाना दिल्याचा अनेक प्रकार समोर आले आहेत, हे गैरप्रकार रोखण्यासाठी परिवहन विभागाने सोमवारी (दि. १०) मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी यांनी प्रादेशिक परिवहन विभागांना दिले आहेत. यामुळे बोगस परवाना घेण्याचे प्रमाण कमी होणार आहे.
पक्की अनुज्ञप्ती चाचणी घेण्यासाठी ज्यांची नियुक्ती असेल, अशा सर्व मोटार वाहन निरीक्षक/सहायक मोटार वाहन निरीक्षक यांनी हजेरी पटावर स्वाक्षरी केल्याशिवाय मैदानावर चाचणी घेण्यास जाऊ नये. चाचणीसाठी हजर झालेल्या उमेदवाराचे नाव, अर्ज क्रमांक, उमेदवाराची सही, वाहन संवर्ग अशी आवश्यक माहितीची नोंद एका नोंद वहीमध्ये घ्यावी. ड्रायव्हिंग स्कूलमार्फत येणाऱ्या उमे दवाराची चाचणी संबंधित ड्रायव्हिंग स्कूलच्या वाहनावर घेण्यात यावी. चाचणीपूर्वी वाहनाच्या कागदपत्रांची खातरजमा करून त्याची नोंद नोंदवहीत करावी. चाचणी घेतल्यानंतर ज्या संवर्गासाठी चाचणी घेतली त्याची नोंद, निकाल व चाचणी घेणाऱ्याची सही इत्यादी नोंद अर्जावर करावी, विहित कालावधीत अर्जाची तपासणी व वाहन चाचणी निकाल याची कार्यवाही संगणकावर पूर्ण करण्याचे आदेश आहेत.



