
खड्यांमुळे चालकाचे नियंत्रण सुटले ; इर्री येथील निर्वाण बारसमोरील घटना
गोंदिया : रेती वाहून नेणारा भरधाव टिप्पर उलटून चालक ठार तर वाहक जखमी झाल्याची घटना तालुक्यातील ग्राम इर्री येथील निर्वाण बारसमोर सोमवारी (दि. २४) सकाळी ७ वाजता घडली. अनमोल महादेव वट्टी (२५, रा. मेहंदीपूर, ता. तिरोडा) असे मृत चालकाचे, तर खुशाल चंदनलाल चौधरी (१८, रा. मुंडीपार-नवरगाव) असे जखमी वाहकाचे नाव आहे.
टिप्परमध्ये (क्र. एमएच ३५ एजे १६१०) ६ ब्रास रेती भरून विनापरवानगीने वाहतूक करीत असताना टिप्परवर कुण्या अधिकाऱ्याने कारवाई करून नये व वाहन अधिकाऱ्यांच्या हातात लागू नये यासाठी चालक अनमोल वट्टी हा टिप्पर भरधाव वेगात चालवित होता. टिप्पर नवरगावकडून कातुर्लीकडे जात असताना सकाळी ७ वाजताच्या सुमारास ग्राम हरी येथील निर्वाण बारसमोर चालकाला रस्त्यावरील खड्डा दिसला. त्या खड्यातून वाहन जाऊ नये आणि वाहन असंतुलित होऊ नये यासाठी चालकाने टिप्परला ब्रेक न लावता खड्डा वाचविण्यासाठी रस्त्याच्या कडेला नेला. परंतु टिप्पर वेगात असल्याने चालकाचे टिप्परवरील नियंत्रण सुटले व टिप्पर उलटला. यात अनमोल वट्टी घटनास्थळीच ठार झाला, तर वाहक खुशाल चौधरी गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल केले आहे.
रेतीघाट बंद असतानाही रेतीचा उपसा करून मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध वाहतूक होत आहे. ही अवैध रेती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी भरधाव वेगात टिपर हाकून मोठी रक्कम कमविणारे रेतीमाफिये चालक व वाहकांना नेहमीच मृत्यूशी खेळायला भाग पाडतात.
ग्राम मोरवाही येथील पोलिस पाटील विनोद ठाकूर यांच्या तक्रारीवरून या अपघातातील चालक मृत अनमोल वट्टी व टिप्पर मालक परवेज पठाण (४०, रा. तिरोडा) या दोघांवर ग्रामीण पोलिसांत भारतीय न्याय संहिता कलम २८१, १०६ (१), १२५ (ए), ३०३, (२), ४९ सहकलम १८४ मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक राहुल खारकर करीत आहेत.



