
गोंंदिया : कोलकत्ता येथील आर.जी. कार मेडिकल कॉलेजमध्ये एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर देशभरातील लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये डॉक्टर संपावर असून याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.या घटनेनंतर पश्चिम बंगालमध्ये तणाव निर्माण झाला आहे. देशभरात व राज्यात निषेध आणि आंदोलने सुरु आहेत.
गोंदिया जिल्ह्यात सुद्धा आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी यांनी कोलकत्ता घटनेचा निषेध केला आहे. जिल्हा परिषद येथील जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात निषेध सभा घेवुन कोलकत्ता घटनेचा निषेध करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. रोशन राऊत, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण, गोंदिया तालुका आरोग्य अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल, देवरी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ललित कुकडे, तिरोडा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दर्शना नंदागवळी, अर्जुनी मोरगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुकन्या कांबळे, सडक अर्जुनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रणित पाटील, सालेकसा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील आत्राम, कुष्ठरोग विभागाचे डॉ. भाग्यश्री गावंडे, जिल्हा क्षयरोग विभागाचे डॉ. देव चांदेवर उपस्थित होते. तसेच 16 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, सामुदायिक आरोग्य अधिकारी यांनी ओपीडी बाह्यरुग्ण सेवे दरम्यान काळी फिती लावुन रुग्ण सेवा प्रदान केली.
जिल्हा मॅग्मो संघटना, इंडियन मेडिकल असोसिएशन व जिल्ह्यातील डॉक्टरांनी देखील याबाबत आक्रमक पवित्रा धारण केला असून या प्रकरणातील गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे. कोलकत्ता येथील डॉक्टरच्या हत्येनंतर आयएमए व मॅग्मो यांनी म्हटलं की, रुग्णालये सेफ झोन म्हणून घोषित करण्यासोबतच केंद्रीय संरक्षण कायदा तातडीने लागू करावा. तसेच रुग्णालयांमध्ये सीसीटीव्ही आणि सुरक्षा व्यवस्था बळकट करावी. रुग्णालयांमध्ये काम करणारे डॉक्टर, स्टाफ नर्स, आणि परिचारिका यांना कायमस्वरुपी सरंक्षण मिळणे गरजेचे आहे.



