क्राईमगोंदियाविदर्भ

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या ; आरोपीने केले आत्मसमर्पण

अंभोरा येथील घटना ; सहा महिन्यांपासून दोघांमध्ये सुरु होता वाद

गोंदिया: रावणवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंभोरा येथे एका धक्कादायक घटनेत पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. ही घटना ८ मे रोजी रात्री सुमारे ११.३० वाजता घडली. आरती सुनील पटले (वय ३०) असे मृत महिलेचे नाव असून, तिचा पती सुनील मदन पटले हा आरोपी आहे.

रावणवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील पटले आणि आरती यांचा सहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता आणि त्यांना दीड वर्षांचा एक मुलगा आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुनीलला आरतीच्या चारित्र्यावर संशय होता, ज्यामुळे दोघांमध्ये वारंवार खटके उडत होते. ८ मे रोजी रात्री याच कारणावरून दोघांमध्ये पुन्हा वाद झाला आणि रागाच्या भरात सुनीलने घरात असलेल्या कुऱ्हाडीने आरतीवर अनेक वार केले, ज्यात तिचा जागीच मृत्यू झाला.

पत्नीची हत्या केल्यानंतर सुनील पटले स्वतःहून रावणवाडी पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने आत्मसमर्पण केले. पोलिसांनी आरोपी सुनील पटले याच्याविरुद्ध हत्या आणि अन्य संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नवकार हे करत आहेत.

या घटनेबाबत अधिक माहिती देताना रावणवाडीचे पोलीस निरीक्षक मंगेश पवार यांनी सांगितले की, लग्नानंतर दोघांचा संसार सुखाने सुरू होता, मात्र गेल्या वर्षभरापासून सुनील पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. याच संशयामुळे दोघांमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून भांडणे सुरू होती. ८ मे रोजी रात्री झालेल्या याच भांडणातून सुनीलने आरतीची कुऱ्हाडीने हत्या केली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button