क्राईमगोंदियाविदर्भ

गोंदिया-बरौनी एक्स्प्रेसमधून १० लाखांचे दागिने जप्त

दोन प्रवाशांना रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने घेतले ताब्यात

गोंदिया : गोंदिया-बरौनी एक्स्प्रेसमधून चांदीच्या दागिन्यांची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन प्रवाशांना रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून १० किलो ३६८ ग्रॅम चांदीचे दागिने जप्त करून पुढील कारवाईसाठी नागपूर आयकर विभागाला कळविल्यानंतर ते तपासासाठी सुपूर्द केले. ९ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास ही कारवाई केली. नरेश कन्हैयालाल वलेछा (६२, रा. सिंधी कॉलनी) व विष्णू गोपीचंद नागभिरे (५४, रा. श्रीनगर वॉर्ड, गोंदिया) अशी ताब्यात घेतलेल्या प्रवाशांची नावे आहेत.

विभागीय कार्यदल निरीक्षक प्रभारी कुलवंत सिंग, उपनिरीक्षक राहुल पांडे, सहायक उपनिरीक्षक धर्मेंद्र कुमार, हवालदार विशाल थावरे, उपनिरीक्षक दीपक कुमार, हेड कॉन्स्टेबल निखिलेश कमार यांच्या नेतृत्वाखाली गोंदिया रेल्वेस्थानकावर गोंदिया-बरौनी एक्स्प्रेसमध्ये तपासणी करीत होते. या गाडीतील प्रवासी नरेश वलेछा आणि विष्णू नागभिरे या दोन प्रवाशांना ताब्यात घेऊन झडती घेण्यात आली. झडती घेतली असता त्याच्या पिशवीत १० किलो ३६८ ग्रॅम चांदीचे दागिने सापडले. ज्याची अंदाजे किंमत ९ लाख ७४ हजार ५९२ रुपये आहे.

त्याच्याकडे या दागिन्यांसंदर्भात चौकशी केली असता कोणतीही वैध कागदपत्रे आढळून आली नाहीत. दोन्ही प्रवाशांकडून वरील चांदीचे दागिने जप्त करण्यात आले. हे प्रकरण नागपुर आयकर विभागाकडे चौकशीसाठी सुपूर्द करण्यात आले आहेत.

दि. ३ एप्रिल रोजी रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने गोंदिया रेल्वेस्थानकावर संशयास्पद स्थितीत वावरणाऱ्या एका प्रवाशाकडून ९ लाख १० हजार रोख जप्त केले होते. या प्रवाशाने संबंधित रक्कम कुठून आणली याबाबत समाधानकारक उत्तर न दिल्याने ही रक्कम जप्त करुन हे प्रकरण आयकर विभागाकडे वळविले होते. त्यानंतर दि. ९ एप्रिल रोजी रेल्वे सुरक्षा बलाने ही दुसरी कारवाई केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button