गडचिरोलीविदर्भ

हत्तींचा बंदोबस्त करा, अन्यथा जनआंदोलन उभारणार

काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांचा इशारा

गडचिरोली : जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून धुमाकूळ घालणाऱ्या रानटी हत्तींमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी हवालदिल झाले आहेत. गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ही समस्या सोडविण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार आणि निदर्शने, मोर्चे असे आंदोलन करून वन्य प्राण्यांचा त्रास कमी करण्यासाठी त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात आतापर्यंत त्यावर तोडगा काढला नाही. त्यामुळे या समस्येसाठी आता जनआंदोलन उभारण्याचा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिला आहे.

मागील काळात वनमंत्र्यांच्या घरावर घंटानाद आंदोलन करण्यात आले. तसेच गडचिरोली ते नागपूरपर्यंत पायी मोर्चासुद्धा काढून जिल्ह्यातील वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यावेळी त्यांनी यावर उपाययोजना करण्याचा शब्द दिला होता. काँग्रेसने केलेल्या मागणीमुळे दोन वर्षानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावर्षी जंगली वाघांचा बंदोबस्त करण्याच्या अनुषंगाने अहवाल सादर करण्यासंदर्भात निर्देश जारी केले, मात्र त्यांच्याच गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तींनीसुद्धा नागरिकांचे जगणे कठीण केले असताना अजूनपर्यंत हत्तींचा बंदोबस्त करण्यासंदर्भात मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुठल्याही प्रकारचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना किंवा प्रशासनाला दिलेले नाही.

ऐन पीक निघण्याच्या वेळेवर जंगली हत्तींकडून मोठ्या प्रमाणात पिकाची नासधूस केल्या जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. हत्तीने किंवा अन्य वन्यप्राण्यांद्वारे केलेल्या नुकसानीसाठी देण्यात येणारी मदत ही अत्यंत तुटपुंजी आहे. त्यामुळे धानशेतीला एकरी किमान सरसकट 1 लक्ष रुपये, तर मका पिकाला एकरी सरसकट 2 लक्ष रुपये मदत देण्यात यावी आणि या रानटी हत्तींचा तातडीने बंदोबस्त करावा. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे, अन्यथा गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने हजारो शेतकऱ्यांना घेऊन जिल्ह्यात मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button