
चंद्रपूर : शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. मात्र, रस्त्याच्या दुरुस्तीकडे मनपाचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे शनिवारी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव इंजि. रमीज शेख यांच्या नेतृत्वात मनपा प्रशासनाविरोधात नामकरण आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची मनपा प्रशासनाने दखल घेत रात्रीच रस्त्याच्या डागडुजीला सुरुवात केली आहे.
शहरातील नगीनबाग प्रभागातील सिस्टर कॉलनी परिसर, रामनगर- दाताळा मार्गावर मोठ-मोठे खड्डे पडले असल्याने युवक काँग्रेसने आंदोलन करीत खड्ड्यांना मनपाचे नाव दिले होते. आंदोलन होताच मनपा प्रशासनाने लगेच दखल घेत कंत्राटदाराला सांगून रस्त्याची डागडुजी करण्यात आली.
यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव इंजि. रमीज शेख यांचीसुद्धा उपस्थिती होती. रस्त्याची डागडुजी सुरू केल्याने त्यांनी मनपाचे आभार मानले. याप्रसंगी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व सदस्य तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



