
गडचिरोली : निराधार योजनेच्या लाभार्थी महिलांना ‘लाडकी बहिण’ योजनेचा लाभ देण्यात यावा, या प्रमुख मागणीसह निराधार, शेतकरी, शेतमजूर आणि कामगारांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या (शेकाप) वतीने बुधवारी, १४ मे रोजी सकाळी ११ वाजता गडचिरोली तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय ठिय्या आंदोलन आणि निदर्शने करण्यात येणार आहेत.
गडचिरोली तालुक्यातील श्रावणबाळ निराधार, वृद्धापकाळ, संजय गांधी निराधार आणि विधवा परित्यक्ता लाभार्थ्यांना गेल्या काही महिन्यांपासून त्यांचे अर्थसहाय्य वेळेवर मिळालेले नाही. हजारो लाभार्थी पात्र असूनही त्यांना या योजनांचा लाभ मिळालेला नाही. तसेच, रोजगार हमी योजनेची मजुरी देखील वेळेवर दिली जात नसल्याचा आरोप शेकापने केला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सामान्य माणसांचे जगणे कठीण झाले आहे, असा आरोप शेकापने केला आहे.
निराधार, विधवा, घटस्फोटीत लाभार्थ्यांना त्यांचे अनुदान वेळेवर मिळावे आणि पात्र लाभार्थ्यांना या योजनांचा नव्याने लाभ देण्यात यावा. शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे अनुदान तातडीने देण्यात यावे. धान बोनस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे. सर्व निराधार योजना लाभार्थ्यांना मासिक ५ हजार रुपये पेन्शन देण्यात यावी. गडचिरोली शहरातील संघर्षनगर, इंदिरानगर, शाहूनगर, गोकुळनगर, विवेकानंदनगर आणि विसापूर भागातील शासकीय जागेवर अतिक्रमण करून घरे बांधणाऱ्या नागरिकांना घरांचे कायमस्वरूपी पट्टे देऊन नगरपरिषदेमार्फत घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा, या मागण्यांचा या आंदोलनात समावेश आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, महिला नेत्या जयश्रीताई जराते, जिल्हा समिती सदस्य डॉ. गुरुदास सेमस्कर, भटके-विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष डंबाजी भोयर, शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष गोविंदा बाबणवाडे, आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष रामदास आलाम, महिला जिल्हाध्यक्ष कविता ठाकरे आणि पौर्णिमा खेवले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे.
गडचिरोली तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार, वयोवृद्ध निराधार आणि विधवा घटस्फोटीत लाभार्थ्यांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शेकाप तालुका समितीचे पदाधिकारी चंद्रकांत भोयर, तुळशिदास भैसारे, अविनाश कोहळे, योगाजी चापले, अभिलाषा मंडोगडे, देवेंद्र भोयर, रमेश ठाकरे, विलास अडेंगवार, रवींद्र बोदलकर, वसंत चौधरी, उमाजी मुनघाटे, विनोद गेडाम, देवानंद साखरे, रामदास दाणे, अमोल शेरकी, उष्ट्र मेश्राम, देविदास मडावी, हरिदास सिडाम, डंबाजी साखरे, हिराचंद कोटगले, मोरेश्वर बांबोळे, विश्वनाथ म्हशाखेत्री, यशवंत मुरकुटे, बाळकृष्ण मेश्राम, दिलीप चौधरी, ईश्वर मंगर, खुमदेव गायकवाड, सुखदेव मानकर, विलास भोयर, कैलास शिंपी, रेवनाथ मेश्राम, किसन साखरे, महागू पिपरे, विजय भोयर, यमाजी गेडाम, राहुल गेडाम, मुरलीधर गोटा, पुरणशहा मडावी, कालीदास शेरकी, बालाजी भोयर, राजकुमार प्रधान, छाया भोयर, रजनी खैरे, संगीता चांदेकर, रोहिणी उईके, पौर्णिमा कांबळे, अप्सरा डोईजड, हेमलता मुनघाटे आणि हेमा रायपूरे यांनी केले आहे.



