गडचिरोलीमुख्य बातमी
गोदावरी पुलावरील जीवघेणा खड्डा; अपघाताची शक्यता वाढली, खड्ड्यात नागरिकांनी लावली झाडाची फांदी; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाहनचालकांमध्ये संताप
खड्ड्यात नागरिकांनी लावली झाडाची फांदी; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाहनचालकांमध्ये संताप

गोदावरी पुलावरील जीवघेणा खड्डा; अपघाताची शक्यता वाढली
खड्ड्यात नागरिकांनी लावली झाडाची फांदी; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाहनचालकांमध्ये संताप
गडचिरोली,दि ३१ ऑगस्ट : सिरोंचा शहरापासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या कालेश्वरजवळील गोदावरी नदीवरील पुलावर मोठा खड्डा पडल्याने वाहनचालकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पुलाच्या मध्यभागी असलेल्या या खड्ड्यामुळे विशेषतः रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका वाढला असून, प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
पुलावर काही ठिकाणी यापूर्वीही खड्डे पडले होते. त्यातील काही खड्डे दुरुस्त करण्यात आले असले, तरी सध्या निर्माण झालेला मोठा खड्डा अद्याप तसाच आहे. खड्डा वाहनचालकांच्या सहज लक्षात यावा यासाठी नागरिकांनी त्यामध्ये झाडाची फांदी लावून ठेवली आहे. मात्र, ही तात्पुरती उपाययोजना असून प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
गोदावरी पुलावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. दुचाकीस्वारांसाठी हा खड्डा विशेष धोकादायक ठरत असून, अचानक खड्डा समोर आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटण्याची शक्यता आहे. रात्रीच्या वेळी पुलावरील अंधारामुळे हा धोका आणखी वाढतो. दरम्यान, सिरोंचा शहरापासून धर्मपुरीजवळील प्राणहिता नदीवरील पुलाची अवस्थाही चिंताजनक आहे. या पुलावर अनेक ठिकाणी भगदाडे पडली असून, मागील अनेक वर्षांपासून येथील पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
प्राणहिता पुलावर यापूर्वी शॉर्टसर्किट होऊन एका बकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर पथदिवे सुरू करण्याच्या मागणीसाठी आंदोलनही करण्यात आले. काही काळ पथदिवे सुरू झाले; मात्र पुन्हा बंद पडल्याने अंधाराचे संकट कायम आहे. गोदावरी आणि प्राणहिता हे दोन्ही पूल सिरोंचा परिसरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असतानाही पुलांच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
पुलावरील खड्डे, भगदाडे आणि बंद पथदिव्यांमुळे एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. गोदावरी पुलावरील खड्डा आणि प्राणहिता पुलावरील भगदाडे तातडीने दुरुस्त करून पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सतीश राजाजी यांनी केली आहे. प्रशासनाने तातडीने कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.



