निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करुन, नव्या चेहऱ्यांना संधी देणार : राज ठाकरे
गडचिरोलीच्या दौऱ्यात पत्रकारांशी ॲाफ दी रेकॅार्ड चर्चा

गडचिरोली : विदर्भातील मनसेमध्ये लवकरच संघटनात्मक मोठे फेरबदल होतील. अनेक निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करुन, नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल. अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढणार की नाही याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. जेव्हा अमित निवडणूक लढेल तर गुपचूप लढणार नाही. तुम्हालाही कळेलच, असे राज ठाकरे यांनी पत्रकारांशी ‘ऑफ द रेकॉर्ड’ चर्चेदरम्यान सांगितले.
राज ठाकरे २२ ऑगस्ट रोजी गडचिरोली दौऱ्यावर असताना त्यांनी विधानसभानिहाय निरीक्षकांची बैठक घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना आपण निवडणूक लढवणार का? या प्रश्नावर मात्र त्यांनी नाही म्हणून थेट उत्तर दिले. आगामी विधानसभा निडणूकीत कुणाला कौल मिळेल आत्ता सांगता येत नाही. राजकीय परिस्थिती आणि पक्षांची एवढी सरमिसळ झाली आहे की मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होण्याची शक्यता आहे. मात्र इतर पक्षातील बंडखोर आमच्याकडे आल्यास थेट उमेदवारी देणार नाही. आधी आमच्या कार्यकर्त्यांना संधी देऊ नंतर आलेल्यांचा विचार करू, असेही ते म्हणाले.
लोकसभा निवडणूकीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यांना पाहून मतदान मिळालं नाही, तर मोदी विरोधी मतदान त्यांना मिळालं. लोकसभा निवडणुकीत एससी समाज आणि मुसलमानांनी एकत्र महाविकास आघाडीला मतदान केलं, पण विधानसभा निवडणुकीत तसं होणार नाही. प्रत्येक निवडणूक वेगळी असते. विदर्भातील बहुतांश जागा लढणार, मात्र, नुसती निवडणुक लढवण्यासाठी उमेदवार देणार नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.



